वंचित आघाडीच्या उमेदवारीसाठी आतापासूनच सुरू झाली स्पर्धा

सकाळ वृतसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

- नाशिक जिल्ह्यातील 15 हि विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती पार पडल्या.
- येवला -लासलगाव विधानसभा मतदार संघातील सामाजिक परिस्थिती आणि प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी मिळण्याबद्दल संभ्रम अवस्था आहेच.
- त्यामुळे अनेकजण ऐनवेळी वंचितचा पर्याय स्वीकार तीलही पण आत्ताच इच्छुक वाढले आहे.

येवला : नाशिक जिल्ह्यातील 15 हि विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती पार पडल्या. नाशिक येथील गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडी, पार्लमेंट बोर्डचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील, रेखाताई ठाकूर, भारीपचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्यासह जिल्हा आणि राज्यकार्यकरणीच्या प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

येवला -लासलगाव विधानसभा मतदार संघातील  सामाजिक परिस्थिती आणि प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी मिळण्याबद्दल संभ्रम अवस्था आहेच. त्यामुळे अनेकजण ऐनवेळी वंचितचा पर्याय स्वीकार तीलही पण आत्ताच इच्छुक वाढले आहे.

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत मतदारांचा पाठिंबा मिळाला होता. सध्या सोबत असलेल्या मतदारांचा रेटा लक्षात घेऊन विजयाचे समीकरण जुळवण्यात आले. वंचित आघाडीची उमेदवारी घेऊन हेविवेट नेत्यांना आव्हान देऊन येवला -लासलगाव मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक जण सरसावले आहे. येथील कार्यकर्ते सचिन अलगट, सामाजिक कार्यकर्ते प्रा.जितेश पगारे, धनगर समाजाचे नेते विनायक काळदाते, मारुती घोडेराव, भागवत सोनवणे यांनी  आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होण्यास तयारी दर्शवली आहे. तसच ते मुलाखतीला उपस्थित राहिले.

येवला-लासलगाव  विधानसभा मतदार संघात प्रस्थापित पक्षांचे उमेदवार निश्चित नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना मतदार कंटाळले असून, नव्या चेहऱ्यांना वंचित आघाडीच्या सोशल इंजिनीअरिंगमुळे विजयाचे समीकरण निश्चित दिसत आहे. विधानसभा मतदार संघात मुस्लिम उमेदवारही संपर्कात असून त्यावरही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. म्हणून मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतील उमेदवारांच्या  भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. हे लक्षात घेऊन पैसा, संपत्ती, जाती-धर्माच्या बेड्या तोडून सर्व स्तरातील  बहुजन एकत्र आल्याने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मतदारसंघात विजयी होईल असा दावा भारीपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The competition for deprived electorial candidate has begun