स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बारावीच्या परीक्षापद्धतीत बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

इगतपुरी - जेईई, नीट यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांना सहज सामोरे जाता यावे, या उद्देशाने बारावीच्या परीक्षापद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व पाठांचा अभ्यास करावा लागणार आहे; तसेच याला कोणतेही पर्यायी प्रश्‍न नसतील. यामुळे जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होणार आहे.

येत्या काळात इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिक्षणासाठी देशभरात एकच सामायिक प्रवेश परीक्षा ठेवली जाणार आहे. इंजिनिअरिंगसाठी राज्यात स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असली, तरी वैद्यकीय शिक्षणासाठी देशपातळीवर "नीट' ही परीक्षाच घेतली जाते. मात्र राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांना सामोरे जाता येईल, असा अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धती आपल्याकडे नसल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय परीक्षा अवघड जातात, असा अनुभव आहे. त्या परीक्षा सोप्या जाव्यात, या उद्देशाने सरकारने मागील वर्षीपासून अकरावीच्या परीक्षापद्धतीत बदल केला. आता या वर्षीपासून तो बारावीच्या परीक्षापद्धतीसाठी लागू होणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये म्हणजेच बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना नवी परीक्षापद्धती लागू होणार आहे.

दोन प्रश्‍नपत्रिकांचा राहील पर्याय?
बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना नीट आणि जेईई परीक्षा द्यायची नाही, अशांचा विचार करून परीक्षेसाठी पर्यायी प्रश्‍न नसलेली आणि असलेली अशा दोन प्रश्‍नपत्रिकांचा पर्याय विद्यार्थ्यांना देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबत शिक्षणतज्ज्ञांची मते विचारात घेतली जाणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना "नीट' आणि "जेईई' या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा द्यायच्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पर्याय नसलेली प्रश्‍नपत्रिका सोडवावी व ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षा द्यायच्या नाहीत, त्यांनी पर्याय असलेली प्रश्‍नपत्रिका सोडवावी, असे हे पर्याय देण्याचा विचार आहे.

Web Title: Competition exam preparation hsc exam process changes