जैताणेत सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू

भगवान जगदाळे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

माळमाथा परिसरातील जैताणे(ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच संजय वेडू खैरनार व उपसरपंच आबा बाबूलाल भलकारे यांच्या राजीनाम्यापूर्वीच सरपंच व उपसरपंच पदासाठी इतर सदस्यांमध्ये अंतर्गत धुसफूस व चढाओढ सुरू झाली असून काही सदस्य मात्र 'नॉट रीचेबल' असल्याची चर्चा सुरू आहे. अंतर्गत कलह व गटबाजीमुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच संजय वेडू खैरनार व उपसरपंच आबा बाबूलाल भलकारे यांच्या राजीनाम्यापूर्वीच सरपंच व उपसरपंच पदासाठी इतर सदस्यांमध्ये अंतर्गत धुसफूस व चढाओढ सुरू झाली असून काही सदस्य मात्र 'नॉट रीचेबल' असल्याची चर्चा सुरू आहे. अंतर्गत कलह व गटबाजीमुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सद्या जैताणे ग्रामपंचायतीत विकास, ग्रामविकास आणि समताविकास या तिन्ही पॅनलची एकत्रित सत्ता आहे. त्यात विकास पॅनलचे आठ, ग्रामविकास पॅनलचे सहा तर समताविकास पॅनलचे तीन असे एकूण सतरा सदस्य आहेत. गटनेते संजय खैरनार हे बिनविरोध सरपंच असून आबा भलकारे हे बिनविरोध उपसरपंच आहेत. माजी उपसरपंच नानाभाऊ पगारे यांनी ठरलेल्या मुदतीतच राजीनामा दिला होता. ठरल्यानुसार श्री. खैरनार व श्री. भलकारे यांच्या सरपंच-उपसरपंच पदाची मुदत ऑगस्ट अखेरीस संपत असून त्यांच्या राजीनाम्यापूर्वीच सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

ऑगस्ट 2015 मध्ये ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करताना सुरुवातीस तिन्ही पॅनलचे प्रमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक व सदस्यांमध्ये काही वाटाघाटी झाल्या होत्या. त्यानुसार पाचपैकी सुरुवातीची तीन वर्षे माळी समाजाच्या सदस्याला, तर नंतरची दोन वर्षे धनगर समाजाच्या सदस्याला सरपंचपद देण्याचे ठरले. तर उपसरपंचपदही सुरुवातीची तीन वर्षे धनगर अथवा अन्य समाजाच्या सदस्याला, तर नंतरची दोन वर्षे माळी अथवा अन्य समाजाच्या सदस्याला देण्याचे ठरले. पण नेमकी कोणती टर्म कोणाला व केव्हा द्यायची? याबाबत मात्र संदिग्धता ठेवण्यात आली.

आधीची टर्म कुणाकडे?
ग्रामपंचायत सदस्य न्याहळदे व बच्छाव यांना सामंजस्याने प्रत्येकी एक-एक वर्ष संधी देणे आवश्यक आहे. असे काही सदस्यांचे मत आहे. त्यातही 'आधीची टर्म कुणाकडे?' हा खरा प्रश्न आहे. एक-एक वर्ष संधी द्यायचे जरी ठरले तरी 'पहिली टर्म' ज्याला मिळेल तो नंतर राजीनामा देईल का? हाही एक गहन प्रश्न आहे. त्यामुळे सरपंच निवड बिनविरोध होईल की नाही? याबाबतही साशंकता आहे. उपसरपंच आबा भलकारे यांनाही प्रभारी सरपंचपद मिळावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आधी सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतरच आपण राजीनामा देऊ, अशी भूमिका श्री.भलकारे यांनी घेतली आहे. आगामी काळात सरपंचपदाची व उपसरपंचपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Web Title: competition in jaitane for post of sarpanch