जैताणेत ग्रामीण रुग्णालयाबाबत श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू!

Competition for taking credit for Jaitane rural hospital
Competition for taking credit for Jaitane rural hospital

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सोडले. केवळ चमकोगिरी न करता, सलग पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी 'सकाळ'चेही विशेष आभार मानले.

श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू...
माळमाथा परिसरातील जैताणे ग्रामीण रुग्णालयाच्या जागेला शासनाने अंतिम मंजुरी दिल्यामुळे सद्या श्रेय लाटण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. प्रत्येकाला असे वाटतेय की, आपल्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण रुग्णालय मंजुरीसाठी मेहनत घेतली त्यांच्याऐवजी दुसरेच श्रेय लाटताना दिसत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. शरदचंद्र शाह व समता परिषदेचे दिवंगत जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ माळी आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह शासन-प्रशासनाकडे वेळोवेळी कागदोपत्री पाठपुरावा केला होता. त्यामुळे जून 2008 मध्ये ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली.

सरपंच संजय खैरनार यांचे संघटनकौशल्य...
परंतु गट क्रमांक 92 मधील रुग्णालयाच्या नियोजित जागेला औरंगाबाद खंडपीठाने न्यायालयीन स्थगिती दिल्यामुळे तब्बल 10 वर्षे हे जागेचे भिजत घोंगडे पडून होते. ग्रामपंचायतीच्या भूतपूर्व सदस्यांमध्येही जागेच्या स्थलांतराबाबत मतभेद होते. अखेरीस मावळते सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेत 26 जानेवारी 2018 या दिवशी ग्रामपंचायतीतर्फे खारीखाणमधील गट क्रमांक 654/1 पैकी गावठाणची पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली.

जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचा विशेष पाठपुरावा...
26 जानेवारी 2018च्या ग्रामसभेत पर्यायी जागेचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र कोठावदे सूचक होते, तर ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार अनुमोदक होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या सहकार्याने सर्व कागदोपत्री सोपस्कार पार पाडून हा प्रश्न जलदगतीने मार्गी लावला. ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थानांसाठी अंदाजे अठरा ते वीस कोटी रुपये निधीची गरज आहे.

ग्रामीण रुग्णालय हे 'टीमवर्क'...
याबाबत स्थानिक आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, स्थानिक जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (प्रशासन), मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, सा. बां. (रोजगार हमी) विभाग, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग, सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागांतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व 17 ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती मावळते सरपंच संजय खैरनार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

'जैताणे ग्रामीण रुग्णालय हे अनुशेषांतर्गत मंजूर ग्रामीण रुग्णालय असल्याने निधी लवकर मंजूर होऊ शकतो. निधी मंजूर झाल्याशिवाय रुग्णालयाची निविदा निघूच शकत नाही. तरीही निधी मंजूर व्हायला किमान चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. करारनामा होऊन सनद मिळाल्याबरोबर वैद्यकीय अधीक्षकांच्या नावाने त्वरित सात-बारा उतारा मिळेल.' - डॉ. हर्षवर्धन चित्तम, वैद्यकीय अधीक्षक, जैताणे ग्रामीण रुग्णालय, वर्ग-1

'जैताणे ग्रामपंचायतीने जर खारीखाणमधील पर्यायी पाच एकर जागेचा ठराव मंजूर केला नसता व त्याबाबत अविरत पाठपुरावा केला नसता तर अजून अनेक वर्षे जैताणे ग्रामीण रुग्णालय साकार झाले नसते. त्यामुळे कोणीही फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.' -  ईश्वर न्याहळदे, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, जैताणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com