संपूर्ण कर्जमुक्ती, हमी भावासाठी आता ग्राम पंचायत ते संसद लढा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

'शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव यासह इतरही ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संसदेचे सात दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणीच्या ठरावामुळे द्वारे ग्रामपंचायत ते संसद असा लढा उभारता येईल.ठरावाचा नमुना तालुक्यातील प्रत्येक गावात उपलब्ध करून देणार येईल.'
- भागवतराव सोनवणे, जलहक्क संघर्ष समिती

१ मेच्या विशेष ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन, खा.शेट्टी मांडणार संसदेत विधेयक

येवला (नाशिक): संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या दीडपट हमीभावा बद्दलच्या शिफारशी लागू करण्यासाठी ग्रामपंचायत ते संसद असा लढा उभारला जात आहे. खा. राजू शेट्टी यासाठी संसदेत खाजगी विधेयके मांडणार असून त्याला पाठींबा देण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी १ मे रोजी विशेष ग्रामसभा घेऊन या मागणीचे ठराव मंजूर करून घ्यावेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले आहे.

संपर्ण कर्जमाफी व हमीभाव या मागणीसाठी देशभरातील १९३ शेतकरी संघटनांनी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वज्रमुठ बांधत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती स्थापन केली आहे.शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला "अच्छे दिन' यावे वाटत असेल तर सरकारने दोन्ही विधेयके मंजूर करावीत यासाठी शेट्टी यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवले जाऊन दोन्ही विधेयके मंजूर करावेत,अशी मागणी करणारे ठराव ग्रामपंचायतीने घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

देशव्यापी असलेली १९३ शेतकरी संघटनांची भारतीय किसान संघर्ष समनव्यय समिती कर्ज मुक्ती आणि हमी भावाचा लढा उभारत आहे. भुलथापा देऊन  सरकारला जास्त दिवस सत्तेत राहता येणार नाही. निवडणुक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी, शेतकरीविरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना "बुरे दिन' दाखवू नयेत, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अशा अनेक शेतकरीहिताच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि सरकारने शेतकऱ्यांच्या जखेवर मीठ चोळू नये असेही पत्रकात त्यांनी म्हटले आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत.शेतकऱ्यांची झालेली दयनिय अवस्था दुर करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती स्थापन करून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध लढा उभारला आहे.या लढ्याला सर्व प्रमुख पक्षांचा पाठींबा असून आपल्यालाही पुढे यायचे आहे.”
- श्रावण देवरे,तालुका अध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Complete grants guarantee war against Gram Panchayat to Parliament now