कॉम्प्रेसरच्या स्फोटात दोन घरे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

या घटनेत पाटील यांनी हरभरा विकून घरात ठेवलेले 70 हजार रुपये, संसारपयोगी साहित्य, कपडे, धान्य आदी जळून खाक झाले. घरातील महिलांचे मिळून एकूण 10 ग्राम सोने भिंतीच्या मातीने तयार झालेल्या चिखलात बेपत्ता झाले.

शिरपूर - विखरण ता. शिरपूर येथे आज (ता. 3 जून) सकाळी रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने दोन घरे जमीनदोस्त झाली. या घरांची आग भोवताली पसरून चार घरे जळाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. 

विखरण गावात संभाजी राजाराम पाटील यांचे जुने लाकडी बांधकाम असलेले धाब्याचे घर आहे. सकाळी आठला नाश्ता तयार करताना घरातील गॅस सिलेंडरच्या नळीतून गॅस गळती सुरू झाली. काही क्षणातच नळीने पेट घेतला. आग सिलेंडरच्या तोंडापर्यंत पोहोचली. संभाव्य अपघात लक्षात घेऊन घरातील सर्वजण अंगणात पळाले. शेजाऱ्यांनाही सूचित केल्याने ते बाहेर पडले. पाटील यांच्या घरातील आग पसरत गेली. स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटर कमालीचे तापल्याने त्याच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यात संभाजी पाटील व त्यांचे शेजारी नितीन सुधाकर पाटील यांच्या घराचे छत व भिंती कोसळल्या. शेजारील रघुनाथ न्हावी व भाईदास न्हावी यांची घरेही पेटली.

या घटनेत पाटील यांनी हरभरा विकून घरात ठेवलेले 70 हजार रुपये, संसारपयोगी साहित्य, कपडे, धान्य आदी जळून खाक झाले. घरातील महिलांचे मिळून एकूण 10 ग्राम सोने भिंतीच्या मातीने तयार झालेल्या चिखलात बेपत्ता झाले. चारही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरपूर पालिकेच्या तीन बंबानी मिळून आग आटोक्यात आणली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Compressor blast at Shirpur