आत्मविश्‍वासातून प्रत्येक काम शक्‍य - कृष्णमल जगन्नाथन

आत्मविश्‍वासातून प्रत्येक काम शक्‍य - कृष्णमल जगन्नाथन

जळगाव - महिलांसाठी सद्यःस्थितीत ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती आहे. महिला शक्ती कमकुवत होत आहे. परंतु कोणतेही काम अशक्‍य नाही, महिला यात बदल घडवू शकता. महात्मा गांधींनी महिलांमधील ही शक्ती ओळखून त्यांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केले. तुमच्यातील आत्मबल ओळखून आपण हे करू शकतो, यासाठीची आत्मशक्ती जागृत करण्याची गरज आहे, असे मत कृष्णमल जगन्नाथन यांनी आज व्यक्त केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन, एकता फाऊंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्यूट ऑफ नॉनव्हायलन्स ॲण्ड पीस मदुराई यांच्या विद्यमाने जैन हिल्सवर आजपासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला सुरवात झाली. या परिषदेच्या प्रारंभप्रसंगी उपस्थित महिलांना उद्देशून श्रीमती कृष्णमल जगन्नाथन बोलत होत्या. यावेळी इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्यूट ऑफ नॉनव्हायलन्स ॲण्ड पीस मदुराईच्या प्रमुख जिल कार हॅरिस, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, पी. व्ही. राजागोपाल, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, मार्गालेट ट्यूबलेट, आयडा गामया, हरियागो सांडिरगो, दलिचंद जैन आदी उपस्थित होते. परिषदेत ३५ देशांतील महिला प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 

श्रीमती जगन्नाथन म्हणाल्या, की एक महिला काय करू शकते, हे पश्‍चिम बंगालमधून आलेल्या ममता बॅनर्जींनी दाखवून दिले. पश्‍चिम बंगालमध्ये सलग २६ दिवस आंदोलन करत टाटा, बिर्ला यांच्याविरोधात लढा पुकारला होता. महिलांमध्ये आत्मबल आहे; फक्त ती जागृत करण्याची गरज आहे.

कर्तृत्व सिद्ध करा - न्या. धर्माधिकारी
मुलीच्या जन्माचे स्वागत होत नाही, ते होण्यासाठी मुलींनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे. आई होण्यासाठी पुरुषाला शरण जावे लागत असते. पुरुष ब्रह्मचारी राहू शकतो, त्याप्रमाणे स्त्रीदेखील राहू शकते. स्त्रिचे स्वतंत्र अस्तित्व असल्याने ती स्वयंभू का असू शकत नाही. देशात आदिवासी महिला अधिक असून, त्यांची ओळख नसल्याने सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. पण याच आदिवासी महिला इतर कोणत्याही महिलांपेक्षा सक्षम व स्वावलंबी आहेत, असे न्या. धर्माधिकारी म्हणाले.

विविध देशांमधील माती एकत्रित
जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी एकता फाऊंडेशनचे काम सुरू असून, महिला परिषदेच्या निमित्ताने देश-विदेशातून आलेल्या महिलांनी आणलेली माती येथे एकत्रित करण्यात येऊन एकता फाऊंडेशनच्या कृष्णमल जगन्नाथन यांना देण्यात आली. यात अमेरिका, कॅनडा, आल्मिनिया, कोलंबिया, इटली, केनिया, ब्राझील, फिलिपीन्स, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांगलादेश, जर्मनी, यूएसए या देशांसोबत भारतातील आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, झारखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण येथील माती एकत्रित करण्यात आली.

५० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान 
आदिवासी ग्रामीण भागात आव्हानात्मक परिस्थिती असतानाही गांधी विचारांना अंगीकारून कार्य करणाऱ्या निवडक ५० महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सर्व महिलांना प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यात सातपुड्यातील आदिवासी भागात वनहक्कांसाठी झटणाऱ्या झिलाबाई वसावे, मराठवाड्यात जलसाक्षरतेसाठी लोकसहभागात महिलांच्या पुढाकारासाठी झटणाऱ्या सुमनबाई देशमुख या महाराष्ट्रातील महिलांसह देशातील विविध भागांमधील पन्नास महिलांचा सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com