'इतका धाक वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दौरे करू नये'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

धुळे - विविध कामांचे उद्‌घाटन आणि जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यात पोलिसांनी सत्ताधारी शिवसेनेसह प्रमुख पक्षांचे आजी- माजी नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावल्याने संबंधित पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एवढा धाक वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दौरे करू नये, अशी खोचक टिका कॉंग्रेससह अन्य विरोधकांनी केली आहे.

धुळे - विविध कामांचे उद्‌घाटन आणि जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यात पोलिसांनी सत्ताधारी शिवसेनेसह प्रमुख पक्षांचे आजी- माजी नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावल्याने संबंधित पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एवढा धाक वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दौरे करू नये, अशी खोचक टिका कॉंग्रेससह अन्य विरोधकांनी केली आहे.

विविध घडामोडींमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून ते नियंत्रणात कसे आणावे, या विचारात पोलिस व महसूल यंत्रणा पडली आहे. धुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापौर कल्पना महाले यांच्यासह सत्तेतील घटक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही (विविध पक्षांचे मिळून एकूण 38 जण) प्रतिबंधात्मक नोटीस दिली गेल्याने त्यांच्या गोटात पोलिस आणि युती शासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

राजकीय वर्तुळात चीड
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी प्रतिष्ठीत आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांना अशी नोटीस बजावण्याचा येथे हा पहिलाच विचित्र प्रसंग असून गुन्हे दाखल नसतानाही त्यांना अशी नोटीस बजावण्यात आल्याने, समाजकंटकांच्या रांगेत बसविण्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय वर्तुळात चीड व्यक्त केली जात आहे.

तर दौरे करू नयेत
जिल्ह्यातील पोलिस भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अशा नोटीसा बजावणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे, एवढाच धाक वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दौरे करू नये, अशी खरमरीत टिका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली.

पांझरा नदीत सभेमुळेही वाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची सायंकाळी सहाला थेट पांझरा नदी पात्रात सभा होत असल्याने विरोधकांसह पर्यावरण प्रेमींनी टिकेची झोड उठविली आहे.

हरित लवादाकडे तक्रार
विविध मशिनरी पात्रात उतरवून नदीच्या नैसर्गिक स्थितीला क्षती पोहोचवली जात आहे. कुणाच्या परवानगीने हा प्रकार सुरू आहे? आमदार गोटे यांनी केवळ प्रसिध्दीच्या हव्यासापायी नदी पात्रात सभा घेण्याचा चालवलेला खटाटोप अधिकारी का खपवून घेत आहेत? सभेसाठी अन्य जागाच नाहीत का? आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रवीशंकर यांना यमुना नदी येथे कार्यक्रमाच्या नियोजनावरून राष्ट्रीय हरीत लवादाने कोट्यवधी रूपयांचा दंड ठोठावला होता. त्यावरून बोध घेण्याऐवजी पांझरा नदी पात्रात सभा होत असल्याने युती सरकारची नेमकी भूमिका काय?, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत विरोधक आणि पर्यावरण प्रेमींनी स्थानिक प्रशासनाची कोंडी केली आहे. त्यामुळे ही सभा आमदार गोटे यांनी आणखी प्रतिष्ठेची केली आहे. याबाबत हरित लवादासह मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे आणि शिवसेनेचे प्रतोद नरेंद्र परदेशी यांनी तक्रार केली आहे.

सभेवर दगडफेक होण्याचा दावा
आमदार गोटे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आठवड्यापासून विविध मुद्यांवरून जोरदार पत्रकयुध्द सुरू आहे. त्यातील वाद पराकोटीला गेल्याने मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली आहे. त्याला प्रत्त्युत्तर देताना आमदार गोटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवर दगडफेक केली जाणार असून तसे करणाऱ्यांना बिवाऱ्यालाही शिल्लक राहू देणार नाही, असा धमकीवजा गर्भित इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसला उद्देशून प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे. त्यामुळे येथे राजकीय वातावरण चिघळले असून ते नियंत्रित करताना पोलिसांना नाकी नऊ येत आहेत. या वातावरणात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याविषयी येथे उत्कंठा वाढली आहे.

Web Title: Congress critic on CM tour of Dhule