काँग्रेसच्या पारंपरिक प्रभागांवर भाजपची नजर

Congress-&-Bjp
Congress-&-Bjp

नाशिक - ‘शत-प्रतिशत भाजप’ची हाक देताना देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या संकल्पनेला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे स्फुरण चढले आहे. त्यातूनच शहरातील पारंपरिक काँग्रेसच्या मतदारसंघांना हादरा देण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. काँग्रेसकडून सातत्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना एकतर भाजपमध्ये प्रवेश द्यायचा किंवा त्यांच्या विरोधात आतापासूनच प्रबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू झाल्याने काँग्रेससाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे.

महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर सलग दुसऱ्या पंचवार्षिकमध्येदेखील काँग्रेसला बहुमत मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दोन गट पडले. सन २००२ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या सातत्याने घटत राहिली. आता दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या अवघ्या एक आकडी संख्येवर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तर काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे.

नेत्यांसह कार्यकर्त्यांतही त्राण राहिले नसल्याने त्याचा फायदा घेण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. यापूर्वी सन २०१७ च्या निवडणुकीत सातत्याने महापालिकेत निवडून येणारे दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, दिनकर आढाव यांना भाजपने उमेदवारी देत निवडून आणले. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये असलेल्या नगरसेवकांवर भाजपकडून सूक्ष्म नजर ठेवली जात आहे. महापालिका निवडणूक येईपर्यंत काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना एकतर भाजपमध्ये प्रवेश द्यायचा किंवा त्यांच्याविरोधात आतापासूनच प्रबळ उमेदवार उभा करून नाशिक शहर काँग्रेसमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com