महापालिकेकडून दुसऱ्या दिवशीही जप्तीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेले १५ गाळे बुधवारी (२ मे) ‘सील’ करून जप्तीच्या कारवाईला सुरवात केली. आज देखील दुसऱ्या मजल्यावरील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या पोटभाडेकरूंच्या दोन गाळ्यांना ‘सील’ लावले.

जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेले १५ गाळे बुधवारी (२ मे) ‘सील’ करून जप्तीच्या कारवाईला सुरवात केली. आज देखील दुसऱ्या मजल्यावरील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या पोटभाडेकरूंच्या दोन गाळ्यांना ‘सील’ लावले.

महापालिकेच्या २० व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळेधारकांना प्रशासनाने ८१ (ब) प्रमाणे गाळे जप्तीच्या नोटीस बजावल्या होत्या. याबाबत न्यायालयात काही व्यापारी संकुलांची याचिका अद्याप प्रलंबित आहे. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे बुधवारी होणारी गाळेधारकांची बैठक रद्द झाल्याचे समजताच महापालिका प्रशासनाने पोटभाडेकरू असलेल्या १५ गाळ्यांना ‘सील’ लावण्याची कार्यवाही सुरू केली होती. आज देखील महापालिका प्रशासनाने दुपारी साडेचारच्या सुमारास महापालिकेचे पथक पुन्हा सेन्ट्रल फुले मार्केटमध्ये गाळे जप्तीसाठी पोहोचले. यात दुसऱ्या माळ्यावर जी विंगमध्ये असलेल्या िद ओरिएन्टल इंशुरन्स कंपनी लिमिटेडचे दोन गाळे (हॉल) सील करण्यात आले. 

दोन गाळ्यांचे पावणेदोन कोटी थकीत
पोटभाडेकरू म्हणून असलेल्या दि ओरिएन्टल इंशुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीकडे पाच वर्षाचे १ कोटी ७५ लाख रुपये हे गाळेभाडे व मालमत्ता कर थकीत आहे. पालिकेने दिलेल्या बिलापैकी केवळ पाच लाख रुपये कंपनीकडून भरण्यात आले. त्यामुळे पावणेसहाला या दोघी गाळ्यांना कंपनीचे कामकाज झाल्यानंतर सील करण्यात आले. 

कारवाई थांबविण्यासाठी आयुक्तांपर्यंत धाव
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून गाळे जप्तीची कारवाई थांबवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी कंपनीतर्फे ॲड. मंडोरे यांनी पैसे सोमवारपर्यंत भरतो, सील करू नये, असे सांगितले. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तांना भेटा असे सांगितले. कंपनीचे प्रतिनिधी व वकील यांनी आयुक्तांची भेट घेऊन पैसे सोमवारपर्यंत भरतो, असे सांगितले. यावर आयुक्तांनी गाळे ‘सील’ची कारवाई होणार, पैसे भरल्यावर ‘सील’ काढले जाणार, असे सांगितले.

अन्य गाळे जप्त करण्याचे संकेत
महापालिका प्रशासनाकडून मुदत संपलेल्या २० संकुलातील २ हजार ३८७ गाळेधारकांवर गाळे जप्तीची कारवाई केली जाणार. त्यापैकी काही दिवसांपूर्वी जुने बीजे मार्केटमधील २ तर सेंट्रल फुले मार्केटमधील १७ गाळे जप्त केले आहे. त्यामुळे उर्वरित गाळे जप्त करण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू असून लवकरच हे गाळे देखील सील केले जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. 

मार्केटमध्ये अस्वच्छता 
जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी फुले मार्केटची पाहणी केल्यानंतर स्वच्छता करण्याबाबत व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. परंतु प्रशासनाने गाळे जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वच्छता करण्याचे पैसे न देण्याचे ठरविल्याने सफाई मक्तेदाराने स्वच्छतेचे काम एक मेपासून थांबविले आहे. त्यामुळे संकुलात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहे. 

Web Title: Consequences of seizure from next day Municipal Corporation