बागलाण तालुक्यात भारनियमन व वीज करवाढीच्या नावाखाली ग्राहकांची मोठी लुट

satana
satana

सटाणा - बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीतर्फे ऐन सणासुदीच्या काळात अन्यायकारक भारनियमन सुरु केले असून अतिरिक्त करवाढीच्या गोंडस नावाखाली वीज ग्राहकांची मोठी लुट सुरु आहे. या अन्यायाविरोधात ग्राहकांची बाजू मांडण्यासाठी काल शुक्रवार (ता.२६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व वीज ग्राहक येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले असता कार्यकारी अभियंता अनिल उईके हे गैरहजर असल्याने सोनवणे यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन लावून गांधीगिरी आंदोलन छेडले आणि ग्राहकांची लुट करणाऱ्या वीज वितरण कंपनीचा निषेध केला. वीज दरवाढ तात्काळ मागे घेऊन सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलनाचा इशाराही श्री. सोनवणे यांनी दिला.

यावेळी कंपनीचे सहाय्यक अभियंता एच. एस. भिरूड यांनी आंदोलकांशी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात, बागलाण तालुक्यात पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी, व्यापारी व उद्योजकांसह सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. यात भर म्हणून वीज वितरण कंपनीकडून अन्यायकारक भारनियमन सुरु असून कमी दाबाने वीजपुरवठा करणे, मध्येच वीजपुरवठा खंडित करून शेतकरी व जनतेला त्रास दिला जात आहे. थोड्याफार प्रमाणात पाणी शिल्लक असताना पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. ट्रान्सफार्मर बिघडल्यास तो तात्काळ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐन दिवाळीचा सण तोंडावर असताना वीज भारनियमन सुरु झाल्याने बाजारपेठा ठप्प होऊन व्यापारावर परिणाम झाला आहे.

वीज वितरण कंपनी वीज देयकांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट व फसवणूक करीत असून वीजबिलात दर्शविलेले वितरण हे सामान्य ग्राहकांना समजण्यापलिकडचे असते. महावितरणद्वारे दरमहा वीज आकार देयकात १६ प्रकारचे कर असतात. यात स्थिर आकार, वीज, शुल्क, इंधन समायोजन आकार, वीज विक्री कर व सरासरी देयकाची रक्कम, व्याज इतर आकार, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, देयकाची निव्वळ रक्कम, पूर्णांक देयक, सुरक्षा ठेव जमा आदींचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात २५० रुपये आकारले असताना ऑक्टोबर महिन्यात ३५० रुपये कर आकारून कंपनी ग्राहकांची लुट करीत आहे. कंपनीने वीज दरवाढ तात्काळ मागे घेऊन सणासुदीच्या काळात सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, विजयराज वाघ, नगरसेवक काकाजी सोनवणे, फईम शेख, पांडुरंग सोनवणे, पंडितराव अहिरे, ज. ल. पाटील, एजाज शेख, सलीम मन्सुरी, अनिल चव्हाण, संदीप भामरे, रवींद्र शिंदे, पिंटू सूर्यवंशी, जॉनटी सोनवणे आदींसह ग्राहक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com