‘सारी दुनिया का बोझ उठानेवाले...’ फलाटांवर दिसेनासे झाले..!

देविदास वाणी
बुधवार, 11 एप्रिल 2018

जळगाव  - ‘लोग आते है लोग जाते है... सारी दुनिया का बोझ हम उठाते है...’ या ओळींतून ज्यांच्या कष्टाला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चेहरा दिला, ते ‘कुली’ अर्थात हमाल काळाच्या प्रवाहात रेल्वेस्थानकांवर दिसेनासे झाले आहेत. राज्यात रेल्वे स्थानकांवर आजच्या घडीला पंचवीस हजार कुली असल्याची कागदोपत्री नोंद असली, तरी प्रत्यक्षात फलाटांवर आता ते फारसे दिसत नाहीत. शिक्षणाकडे वळलेली नवी पिढी, तुलनेने चांगला मोबदला देणारे नवे रोजगार आणि प्रवासाच्या आधुनिक साधन-सुविधांमुळे प्रवाशांची कमी झालेली गरज यामुळे लाल वेशातले, दंडावर पितळी बिल्ला लावलेले हमाल फलाटावर दुर्मिळ झाले आहेत.

सुविधांनी हिरावला रोजगार
रेल्वेस्थानक अन कुली (प्रवाशांचा सामान नेणारे हमाल) यांचे नाते ब्रिटिशकाळात रेल्वे अस्तित्वात आल्यापासून कायम आहे. राज्यात सुमारे २५ हजार कुली आहेत. आता अत्याधुनिक ‘व्हील बॅग’ निघाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी स्वतःच बॅग ओढत नेतात. याचा परिणाम मात्र कुलींच्या रोजगारावर मोठ्या प्रमाणात झाला. सद्यःस्थितीत रोजगार मिळत नसल्याची खंत काही कुलींनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. दुसरीकडे बहुतांश रेल्वे स्थानकावर स्लायडिंग (सरकते) जिने झाले आहेत. काही ठिकाणी लिफ्टची सोय आहे. यामुळे सामान नेण्यासाठी कुलीची गरज नसते.

नोकरीसाठी लढा सुरूच
बदलत्या युगात रेल्वेत मोठे सामान नेणाऱ्यांची संख्या घटत चालली. कुलींना हमालीचे कामे मिळणे भविष्यात दुरापास्त होईल, अशा भीतीने कुली संघटनेने रेल्वे मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदने दिली, आंदोलने केली होती. याची दखल घेत तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी कुलींचा रेल्वे खात्यात शिक्षणानुसार नोकऱ्या देऊन समावेश करवून घेतला. तरी अद्यापही अनेक कुलींना रेल्वेत सेवा मिळालेली नाही. त्यांचा रेल्वेत नोकरी मिळण्यासाठी लढा सुरू आहेच.

मुलांच्या शिक्षणाचा परिणाम
कुलींचा व्यवसाय त्यांचे पुत्र, नातवांनी अनेक रेल्वे स्थानकावर पुढे सुरू ठेवला होता. मात्र, पुरेसा रोजगार मिळत नसल्याने त्यातील काहींनी बाहेर शिक्षण प्रमाणे इतर नोकरी, व्यवसाय सुरू केला. यामुळे नव्याने आता कुली म्हणून रुजू होताना दिसत नाही. अशा एक ना अनेक कारणांमुळे कुली या व्यवसायाबाहेर पडत आहे. नवीन पिढीतील युवक रोजगार पुरेसा नसल्याने कुली तयार होत नाही. यामुळे जे जुने कुली आहेत किंवा जे वीस वर्षांपासून या व्यवसायात आहे तेच कार्यरत आहेत.

विभागात फक्त साडेसातशे कुली
जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरीपर्यंत, दुसरीकडे नागपूर, खंडव्यापर्यंत भुसावळ रेल्वे विभागाची हद्द आहे. या सर्व रेल्वेस्थानकांवर मिळून पूर्वी अडीच हजार कुली होते. आता ही संख्या अवघी साडेसातशेवर येऊन ठेपली आहे.

आमची तिसरी पिढी कुली व्यवसायात आहे. पूर्वी आजोबा, वडिलांना प्रवाशांचा सामान वाहताना पाहायचो. त्यांच्या जागेवर कुली म्हणून लागलो. आता प्रवासी कुलींना सामान ने आण करण्याची कामे देत नाही. यामुळे रोजगार मिळत नाही.
- गुलाम दस्तगीर

‘कुली’ हा व्यवसाय कालबाह्य होत असल्याने कुलींना रेल्वेत चतुर्थ श्रेणीत नोकरी मिळण्यासाठी कुली संघटनेने आंदोलने केली आहेत. पण, केवळ आश्‍वासने मिळाली. किमान आमच्या मुलांना तरी रेल्वेत सामावून घ्यावे. अशी मागणी आता कुली संघटनेने लावून धरली आहे.
- कयामोद्दीन फिरोजोद्दीन

Web Title: coolie railway station