पिवळ्या सोन्याला पोल्ट्रीचा आधार

sweetcorn
sweetcorn

येवला - अवर्षणप्रवण तालुक्यातील शेतीही अडीच हंगामापुरतीच मर्यादित राहिल्याने येथील शेतकऱ्यांना मका, कपाशी व कांद्यासारख्या नगदी पिकांवर अवलंबून रहावे लागत आहे. योवला मक्याची तर मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत असून, या पिकाने मालामाल केल्याचे चित्र होते. यंदा मात्र तरी येथील मक्याला दक्षिणेकडील राज्यांकडून मागणी नसल्याने राज्यासह गुजराथ व मुंबईतील पोल्ट्री व कंपन्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामध्ये भावही समाधानकारक नसल्याने मागील वर्षाच्या तुलनेत येवलेकरांना यंदा सुमारे ३० कोटीचा चुना लागला आहे.

या वर्षी शेतकऱ्यांनी कपाशीचे पिक कमी करुन मकाचे अधिक लागवड केली होती. पावसाची अनियमितता असली तरी अल्प पाण्यावर येणाऱ्या या पिकाने शेतकऱ्यांना साथ दिली होती. उत्पादन वाढल्याने व मागणी कमी असल्याने मकाला स्थानिक व्यापाऱ्यांकडे १ हजार १६० रुपयांपर्यत भाव मिळाला. या तुलनेत तालुका खरेदी विक्री संघामार्फत होणाऱ्या शासकीय खरेदीत प्रतिक्विंटल १ हजार ४२५ रुपायांचा म्हणजेच प्रतिक्विंटल तीनशे ते चारशे रुपये अधिक मिळाले. मात्र ही खरेदी अल्पावधीत बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांना विक्री करावी लागली. यंदा कांद्याच्या नोटा झाल्याने आर्थिक अडचणी नसल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातील ओला मका विक्रीला आणल्याचे टाळले. मात्र आधारभूत किमतीने खरेदी सुरु झाल्यावर अनेकांनी घाई केली पण बोटावर मोजण्याइतकीच येथे खरेदी होऊ शकली आहे. 

मागणी घटली पण पोल्ट्रीचा आधार
येथून दरवर्षी परदेशात मोठ्या प्रमाणात मका चारपाच देशांत निर्यात होतो. मागील वर्षी देशावर मागणी नव्हती पण तामीळनाडूत दुष्काळाने मकाचे उत्पादन घटल्याने येथून तामिळनाडूसह हरियाना, पंजाब आदी राज्यात ३५ रॅकमधून सुमारे चार लाखावर क्विंटल मका पोचला होता. यंदा मात्र उलटे चित्र दिसले असून. परदेशात मागणीचा प्रश्नच नव्हता. मात्र तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यात उत्पादन वाढल्याने येथील मकाला मागणी घटली. सगुणा, बारामती अग्रो, कोईनाळ, व्यंकटेश्वरा आदी पोल्ट्री कंपन्यासह गुजराथ मधील स्टार्च कंपन्यानी येथील मकाची मागणी केल्याने या पिकाला आधार मिळाला.

अशी झाली उलाढाल..
येथील शासकीय खरेदीत अवघा २५ हजार क्विंटल मका खरेदी होऊन ४३३ शेतकऱ्यांना ३ कोटी ५८ लाख ७२ हजार मिळाले. मात्र, ही खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने बाजार समितीत मका विक्री करावी लागला. ऑक्टोबर ते मे च्या दरम्यान बाजार समितीत येथे ३ लाख ५२ हजार क्विंटल तर अंदरसूलला २४ हजार ७६७ क्विंटल मका खरेदी झाली. या खरेदीला ९०० ते १२१५ तर सरासरी ११५० रुपयांचा भाव मिळाल्याने ३७ कोटी शेतकऱ्यांना मिळाले. एवढी मोठी उलाढाल होऊनही मागील वर्षाच्या तुलनेत भाव पडलेले असल्याने सारखेच उत्पादन निघूनही यंदा ३० कोटींची घट झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.      

“यंदा पावसाने दगाफटका करूनही पोषक वातावरण मिळाल्याने मकाची लागवड वाढली अन उत्पादनही सरासरी इतके निघाले. तरी मागणी घटली असल्याने भावात घट सहन करावी लागली. बाहेरून मागणी नसल्याने स्थानिक बाजारपेठेत पोल्ट्रीसाठीच मागणी राहिली.
- डी.सी.खैरनार,सचिव,बाजार समिती,येवला

यंदा मकाचे क्षेत्र वाढले असून युक्रेन, ब्राझील, अमेरिका तसेच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये मका उत्पादन वाढले. यामुळे मागणी घटून भाव वाढले नाही. येथील मका मलेशियाला गेला पण तोही अल्प प्रमाणात. ९० टक्के मका पोल्ट्री व खाद्य कंपन्याना गेला.
- गोरख भागवत,मका व्यापारी,येवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com