esakal | धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना कोरोनाची बाधा 

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना कोरोनाची बाधा 

जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली, तरी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत.

धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना कोरोनाची बाधा 
sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे: जिल्हाधिकारी संजय यादव यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी  समोर आले. श्री. यादव यांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. यादव यांनी केले.

पाच-सहा दिवसांपूर्वीच श्री. यादव यांनी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासोबत धुळे शहराच्या विविध भागात जाऊन पाहणी केली होती. नागरिकांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, गर्दी न करणे याबाबत आवाहन करून काही बेजबाबदार नागिराकांची कानउघाडणीही केली होती. काही वयोवृद्ध व बालकांना त्यांनी स्वतःच्या हातांनी मास्क बांधले होते. बारापत्थर चौक, पाच कंदील, आग्रा रोड आदी भागात ते फिरले होते. या भागातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

प्रशासन सज्ज 
जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली, तरी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. औषधेही पुरेशी आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचेही श्री. यादव यांनी म्हटले आहे. 

माझी कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच चाचणी करून घ्यावी. 
-संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे 

संपादन- भूषण श्रीखंडे