आजी-माजी नगरसेवकांना देणार आजपासून वसुलीच्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

‘मनपा’ प्रशासनाची वसुली कार्यवाही; प्रत्येकाकडून सव्वाकोटीची वसुली

जळगाव - घरकुल व मोफत बससेवा योजनेंतर्गत झालेला गैरव्यवहार व महापालिकेच्या आर्थिक नुकसानीपोटी वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन उद्यापासून (४ जानेवारी) आजी-माजी ५४ नगरसेवकांकडून प्रत्येकी एक कोटी सोळा लाख रुपये वसूल करण्याच्या नोटिसा बजावण्याच्या सूचना आयुक्त जीवन सोनवणे यांनी संबंधीत विभागाला दिल्या आहेत.

‘मनपा’ प्रशासनाची वसुली कार्यवाही; प्रत्येकाकडून सव्वाकोटीची वसुली

जळगाव - घरकुल व मोफत बससेवा योजनेंतर्गत झालेला गैरव्यवहार व महापालिकेच्या आर्थिक नुकसानीपोटी वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन उद्यापासून (४ जानेवारी) आजी-माजी ५४ नगरसेवकांकडून प्रत्येकी एक कोटी सोळा लाख रुपये वसूल करण्याच्या नोटिसा बजावण्याच्या सूचना आयुक्त जीवन सोनवणे यांनी संबंधीत विभागाला दिल्या आहेत.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल प्रकरणातील घोटाळा व मोफत बससेवाप्रकरणी लेखापरीक्षण करण्यात आले होते. या प्रकरणी ५४ नगरसेवकांकडून प्रत्येकी एक कोटी सोळा लाख रुपये वसूल करण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी वसुलीसाठी आजी-माजी नगरसेवकांना नोटिसा बजावल्या होत्या. २०१३ मध्ये निवडणूककाळात नोटिसा बजावल्याने शहरातील मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडून खळबळ उडाली होती. या नोटिसांना स्थगिती मिळावी यासाठी काही नगरसेवकांनी खंडपीठात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर खंडपीठाने स्थगिती दिली होती. परंतु दीपक गुप्ता यांनी त्रयस्त अर्जदार म्हणून औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. २२ डिसेंबर २०१६ ला कामकाज होऊन न्यायाधीश नलावडे यांनी नगरसेवकांच्या याचिका फेटाळल्या होत्या. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांकडून वसुलीचा मार्ग मोकळा झाला होता. खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार आयुक्त जीवन सोनवणे यांनी नोटिसा बजावण्याची सुरू करण्याचे विधी विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार सर्व नोटिसांवर आज आयुक्त सोनवणे यांनी स्वाक्षरी करून त्या उद्यापासून (४ जानेवारी) दिल्या जाणार आहेत. 

आधी नोटिसा स्वीकारलेल्यांना स्मरणपत्र
तत्कालीन आयुक्त कापडणीस यांनी आजी-माजी नगरसेवकांना नोटिसा बजावल्या होत्या. यात अनेकांनी नोटिसा स्वीकारल्या, तर काहींनी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे एक कोटी सोळा लाख रुपये वसूल करण्याच्या नोटिसा ज्यांनी स्वीकारल्या त्यांना महापालिका स्मरणपत्र देणार आहे, तर ज्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत त्यांना पुन्हा वसुलीची नोटीस दिली जाणार आहे. यावेळी नोटिसा घेतल्या नाही, तर नियमानुसार ती त्यांच्या घराच्या दरवाजाला चिकटविली जाईल. यासंदर्भात विधी विभागाचा सल्ला घेण्यात येईल, असे आयुक्त सोनवणे यांनी सांगितले.

पैसे वसूल न होणाऱ्यांसाठी विधीचा सल्ला
घरकुल व मोफत बससेवा या योजनांतील गैरव्यवहारप्रकरणी प्रत्येक नगरसेवकाकडून एक कोटी सोळा लाख रुपये वसूल केले जाणार आहेत. यात काहींकडून घरकुल प्रकरणी एक कोटी सोळा लाख, तर काही नगरसेवकांकडून मोफत बससेवा प्रकरणी पाच लाखांवर रकमेची वसुली केली जाणार आहे. त्यातच आता अनेकांची सद्याची परिस्थिती पाहता एवढी रक्कम वसूल होण्याची चिन्हे दिसत नसल्याने महापालिका प्रशासन यासंदर्भात विधी विभागाशी चर्चा करून वसुलीसाठीचा मार्ग काढण्यात येणार आहे.

विद्यमान सात नगरसेवकांचा समावेश
तत्कालीन नगरपालिकेच्या वेळेचे या प्रकरणातील आजी-माजी नगरसेवकांकडून वसुलीच्या यादीमध्ये सध्याच्या सात विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. तर काही नगरसेवकांचे त्यावेळी पती, आई असल्याने त्यांच्या नावाने या नोटिसा दिल्या जाणार आहेत.

Web Title: corporator recovery notice by municipal