लाचखोर हवालदाराला अडीच वर्षांची सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक : परस्परविरोधी दाखल गुन्ह्यात संशयितांवर कारवाई करण्यासंदर्भात 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 वर्षे 6 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. राजेंद्र यादवराव भामरे असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव असून त्यास 2010 मध्ये वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती.

तक्रारदार संतोष नारायण किरवे (रा. शेणीत ता. इगतपुरी) यांनी त्यांच्या ओळखीचा रमेश जाधव यास एकाठिकाणी कामाला लावले होते. परंतु जाधव यास मद्याचे व्यसन असल्याने संबंधित मालकाने त्यास कामावरून काढून टाकले. त्यामुळे रमेश जाधव याने संतोष किरवे यास मारहाण करून त्यांच्या आईलाही शिवीगाळ केली होती. त्यावेळी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याअंतर्गत शेणीत येथे नेमणुकीस लाचखोर पोलिस हवालदार राजेंद्र भामरे होता. सदरील प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. रमेश जाधव याच्यावर कारवाईची मागणी तक्रारदार किरवे यांनी केली असता, हवालदार भामरे याने त्यांच्याकडे 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार किरवे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार 18 मे 2010 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. लाचखोर राजेंद्र भामरे याने ठाण्यातील विश्रांती खोलीत तक्रारदाराकडून 5 हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली होती. लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ अटक केली होती.

यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायधीश एस.सी. खटी यांच्यासमोर खटला चालून सरकारी पक्षातर्फे ऍड. कल्पक निंबाळकर यांनी साक्षीदार तपासले. त्यात तथ्य आढळून आल्याने न्यायधीश खटी यांनी लाचखोर हवालदार भामरे यास दोषी ठरविले आणि 2 वर्षे 6 महिन्यांची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Web Title: Corrupt policeman sentenced to two-and-a-half years imprisonment