Nandurbar News : पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना..! पिसवांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton

Nandurbar News : पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना..! पिसवांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका

कळंबू (जि. नंदुरबार) : या वर्षी कापसाला चांगला भाव मिळेल‎ या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी‎ फेब्रुवारी महिना सुरू झाल्यावरदेखील‎ कापूस विकला नसल्याने घरात साठवून‎ ठेवलेल्या कापसामुळे किडेसदृश किडे तयार होत‎ असून, या पिसवांमुळे‎ शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांच्या‎ अंगाला खाज सुटण्याचे प्रमाण वाढले‎ आहे. (cotton crop not get price Farmers health threatened by fleas Nandurbar News)

ग्रामीण भागात या रुग्णांच्या‎ संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली‎ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन‎ संकट उभे राहिले आहे.‎ कापसाला जास्त भाव मिळत‎ नसल्यामुळे विकतादेखील येत नाही,‎ तर दुसरीकडे त्यांच्यातील पिसवां‎मुळे अंगाला सुटणाऱ्या‎ खाजेमुळे कापूस घरात ठेवायलाही‎ आता शेतकरी तयार नसल्याने शेतकरी‎ दुहेरी अडचणीत सापडले आहेत.‎

खाजेच्या समस्येमुळे शेतकरीही‎ कंटाळले असून, अनेक ठिकाणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकऱ्यांनी या त्रासामुळे कापूस विक्री‎ करण्यास सुरवात केली आहे. काही‎ शेतकरी घरात कापूस असल्याने‎ रात्रीच्या वेळेस थंडीतही घराबाहेर‎ झोपणे पसंत करत आहेत.

अनेक संकटांचा सामना करून पांढरे सोने शेतकऱ्यांनी पिकविले; परंतु माल हाती येताच बाजारातील दर घसरले. परिणामी आता कापूस घरात ठेवावा तर त्याला पिसवा लागतायत अन् बाजारपेठेत भाव मिळत नाही, अशा द्विधा मनःस्थितीत तालुक्यातील कापूस उत्पादक अडकला आहे. अनेकांच्या नजरा आता दरवाढीकडे लागल्या आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

प्रारंभी कापसाला ११ हजार रुपयांचा भाव मिळाला. मात्र ११ हजारांवरून हा भाव सात हजार ८०० पर्यंत आला आहे. दरवाढीच्या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र दिवसेंदिवस कापसाचे भाव कमी होत आहेत.

अपेक्षेप्रमाणे कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाच्या गंजी प्रत्येक घरात पाहायला मिळत आहेत. या कापसाच्या गंजीला आता पिसवा लागल्या आहेत. त्यामुळे त्या चावा घेतल्यानंतर अंगाला खाज सुटते. त्यामुळे कापसाच्या गंजीजवळ जाऊन पाहणेसुद्धा शेतकऱ्यांना धोकादायक झाले आहे.