सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

चंद्रकांत जाधव
सोमवार, 21 मे 2018

जळगाव - कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या उत्पादनातही भारत आघाडीवर असून, चीनपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे पाच हजार ८०० दशलक्ष किलो सूत उत्पादनाचा अंदाज आहे. याच वेळी देशांतर्गत क्षेत्रात सूत उत्पादनात तमिळनाडूनंतर गुजरात आघाडी घेत असून, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. 

जळगाव - कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या उत्पादनातही भारत आघाडीवर असून, चीनपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे पाच हजार ८०० दशलक्ष किलो सूत उत्पादनाचा अंदाज आहे. याच वेळी देशांतर्गत क्षेत्रात सूत उत्पादनात तमिळनाडूनंतर गुजरात आघाडी घेत असून, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. 

भारत यंदाही सूत उत्पादनात जगात अग्रस्थानी असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. देशात यंदाच्या हंगामात आतापर्यंत १८८४ दशलक्ष किलो सुताचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात एकूण ५६६२ दशलक्ष किलो सुताचे उत्पादन झाले होते.  देशात सुमारे २४०० सूतगिरण्या असून, यातील जवळपास १४८ गिरण्या गुजरातेत आहेत. तमिळनाडूमध्ये सुमारे १८८ सूतगिरण्या आहेत. तर महाराष्ट्रात खासगी व सहकारी मिळून १३३ सूतगिरण्या सुरू आहेत.  

तमिळनाडू व लगतच्या भागातील गिरण्यांना मिळून यंदाही एक कोटी गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज आहे. महाराष्ट्रात ही गरज सुमारे ४७ लाख गाठी तर गुजरातमधील गिरण्यांना ८० लाख गाठींची गरज आहे. गुजरातमध्ये मागील दोन वर्षांत अत्याधुनिक प्रकारच्या व अधिक उत्पादन क्षमतेच्या ६८ सूतगिरण्या सरकारच्या सहकार्याने उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांत व यंदाही गुजरातमध्ये गाठींची मागणी किंवा गरज (कन्झमशन) वाढली आहे. 

देशात यंदा दर महिन्याला सूतगिरण्या व इतर युनिट्‌मध्ये मिळून २८ लाख गाठींचा वापर सूतनिर्मितीसाठी झाला आहे. तर दर महिन्याला चार कोटी किलो सुताचे उत्पादन झाले आहे. यातील ४२ टक्के सुताची निर्यात परदेशात झाली आहे. चीनसह आखाती देशांमध्ये सूत निर्यात सुरू असून, यंदा टेरी टॉवेल, चादरी आदींसाठी वापरात येणाऱ्या जाड (कोर्स) सुताची निर्यात सुमारे १२ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. तर बारीक प्रकारचे सूत (फाइन)देखील चीनमध्ये पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले.

आकडे दृष्टिक्षेपात
३६० लाख गाठी देशांतर्गत सूतगिरण्या व लघुउद्योगांची गरज
२८ लाख गाठी दर महिन्याला देशांतर्गत सूतगिरण्यांमध्ये वापर
३७० लाख गाठी देशात उत्पादनाचा अंदाज
२७५ लाख गाठी देशांतर्गत सूतगिरण्या, मिलची गरज

Web Title: cotton mill production