देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाचे मुख्यमंत्री करतील लोकार्पण

दिगंबर पाटोळे
रविवार, 1 जुलै 2018

मुख्यमंत्र्यांचा प्राथमिक दौऱ्याच्या कार्यक्रमानूसार सोमवारी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री फडणवीस विमानाने ओझर विमानतळावर उतरतील. तेथून वाहनाने ते दुपारी एक वाजता सप्तशृंग गडावर पोहोचतील

वणी (नाशिक) - नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळयास अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार, ता. २ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' चे लोकार्पण संपन्न होत आहे. यामुळे हजारो वृध्द, अपंग भाविक सोमवार पासून देवी मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून आदिमाया सप्तश्रृंगी चरणी नतमस्तक होवू शकणार आहे.

आद्य शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. याठिकाणी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव असे वर्षातून दोन वेळेस मोठी यात्रा भरते. स्वयंभू असलेल्या आदिमायेचे मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी ५५१ पायऱ्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉली बनविण्याचे कंत्राट सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीस दिले होते.

१५ अॉगस्ट २००९ साली प्रकल्पाचे भुमीपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते होवून सुरु झालेले काम अनेक अडीअडचणींवर मात करत नऊ वर्षांच्या कालावधीनंतर एकदाचे पुर्ण झाले आणि भाविकांची फनिक्युलर ट्रॉलीची प्रतिक्षा संपली. मात्र गेल्या सहा महीन्यांपासून तांत्रिक कारणे, विविध विभागाच्या परवानग्या, मुख्यमंत्र्यांचे संभाव्य दौरे रद्द होणे, आचार संहिता अशा या ना त्या कारणांमुळे 'फनिक्युलर ट्रॉलीचा' लोकार्पण सोहळा लांबणीवर पडला होता. दरम्यान विधान परिषदेची आचारसंहिता संपताच मुख्यमंत्री फडणवीस यांचा 'फनिक्युलर ट्रॉली' लोकार्पन सोहळ्यासाठीचा प्राथमिक दौरा शुक्रवारी सकाळी प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनही तयारीला लागले. त्याबाबत सप्तश्रृंगी गडावर विविध विभागाचे अधिकारी, सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत यांची प्राथमिक आढावा बैठक संपन्न झाली. 

मुख्यमंत्र्यांचा दौरा -
मुख्यमंत्र्यांचा प्राथमिक दौऱ्याच्या कार्यक्रमानूसार सोमवारी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री फडणवीस विमानाने ओझर विमानतळावर उतरतील. तेथून वाहनाने ते दुपारी एक वाजता सप्तशृंग गडावर पोहोचतील. येथे फनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण करण्यात येईल. त्यानंतर भवानी पाझर तलावाचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते पुन्हा ओझर विमानतळावर येऊन विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल होऊ शकतो, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आमदार छगन भुजबळ लोकार्पन सोहळ्यास उपस्थित राहाणार आहेत. १७ जुन रोजी छगन भुजबळ हे सर्व कुटुंबीयांसह सप्तश्रृंगी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी आले असता. त्यांनी एकप्रकारे 'फनिक्युलर ट्रॉली'चे ट्रायल उद्घाटन करुन देवीचे दर्शन घेत संकल्प आरती केली होती. यावेळी भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना लवकरच मुख्यमंत्र्यांना 'फनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन करण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले होते. त्यानूसार भुजबळ यांनी आठ दिवसांपूर्वी याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती.  

या लोकार्पन सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे असतील यावेळी महसुल, मदत व पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील, वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा पालकमंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परीषद अध्यक्षा शितल सांगळे आदींसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The countrys first Funicular Trolley project will be inaugurated