धुळे: युवकाच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Court Decision
Court Decision

धुळे : वाळू ठेकेदार आणि बेजबाबदार महसूली अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून झालेल्या अवैध वाळू उत्खननामुळे अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. अशा गंभीर आरोपाचा एक दावा दाखल करून घेत शिंदखेडा न्यायालयाने आज (बुधवार) प्रांताधिकारी, दोन तहसिलदार, दोन तलाठी, दोन मंडळाधिकारी, तीन ठेकेदार, अशा दहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार किशोर भगवान कोळी यांच्या फिर्यादीप्रमाणे शिंदखेडा पोलिस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल झाला. त्यामुळे महसूली अधिकारी, ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. 

तापी नदीलगत उप्परपिंड (ता. शिरपूर) येथे वाळू ठेका मंजूर आहे. त्यासह ठेकेदारांनी अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदी पात्रालगत अवैधपणे वाळूचे उत्खनन सुरू केले. यातून वाळू ठेक्‍यासंबंधी अटीशर्तींचा भंग झाला. अक्कडसे येथे बेडर ठेकेदारांनी अवैधपणे सेक्‍शन पंप, जेसीबी, बोटींसह अन्य यंत्रसामग्रीचा वापर करून वाळू उपसा सुरू ठेवला. परिणामी 50 फूट मोठा खड्डा तयार होऊन पाणी साचले. त्यात पडून सतीश छोटू सैंदाणे (वय 19, रा. अक्कडसे) याचा मृत्यू झाला. तो श्री मनुदेवीच्या दर्शनाला पायी जात असताना ही घटना घडली. असे असताना पीडित कुटुंबाबाबत योग्य भूमिका वठविण्याऐवजी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो वादग्रस खड्डाच संगनमतातून बुजविण्याचा प्रयत्न केला. 

तसेच उप्परपिंड आणि अक्कडसे येथे वाळू उपश्‍याबाबत अटीशर्तींचा सर्रासपणे भंग होत असतानाही जबाबदार अधिकाऱ्यांकडून देखरेख, कर्तव्यबजावणीत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याकडे फिर्यादीने न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत न्यायालयाने संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

ते दहा आरोपी असे : दिपक सुधाकर पाटील ( सुनंदाई बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, प्लॉट न. 44 , खोटे नगर जळगाव), गोरख शालिग्राम पाटील, ज्ञानेश्वर बन्सी पाटील (तिघे ठेकेदार), सुभाष राजाराम साळुंखे (तलाठी, अक्कडसे), जयवंत एम. चव्हाण (तलाठी, उप्परपिंड), एस. आर. पाकरकर (मंडळाधिकारी, अक्कडसे), व्ही. के. बागुल (मंडळाधिकारी, शिरपूर), रोहिदास वारूळे (तहसिलदार, शिंदखेडा), महेश शेलार (तहसिलदार, शिरपूर), नितीन गावंडे (प्रांताधिकारी, शिरपूर विभाग). मंजूर घाटा व्यतिरिक्त इतर ठिकाणाहूनही अवैध वाळू उपसा करण्याचे प्रकार या जिल्ह्यात सर्रास घडत असतात. यात अनेक अधिकारी, पोलिस, ठेकेदार, राजकीय मंडळी हप्तेखोरीतून रग्गड पैसा कमवत आहेत. हीच किड आता सामान्यांचा बळी घेऊ लागल्याने संताप व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com