आमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत 

आमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत 

धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर दोनशेच्या जमावाने चाल करत त्यातील काही विरोधकांनी दगडफेक केली. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने बऱ्याच ठिकाणी अनर्थ टळू शकला. 

महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया अशा काही घटना वगळता शांततेत पार पडली. निवडणूक कालावधीत देवपूरसह विविध भागांत वातावरण चांगलेच तापले. आज सायंकाळनंतर विविध ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे पोलिस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. काही ठिकाणी तक्रारी करण्यास कुणीही पुढे आले नाही. 

फॉरेस्ट कॉलनीत तुफान दगडफेक 
नगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनीत आज दुपारी साडेचारच्या सुमारास पैसे वाटपाच्या संशयावरून दोन गटांत वाद होऊन तुफान दगडफेक झाली. त्यात तीन ते चार जण जखमी झाले. देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच जखमी व जमावाने पळ काढला. फॉरेस्ट कॉलनीत वॉल कंपाउंडलगत शंभर मीटर अंतरावर मतदान केंद्र आहे. कंपाउंडजवळील एका घरात पैसे वाटप होत असल्याची काहींनी तोंडी तक्रार केली. त्यावरून दोन गटांत वाद झाला. त्यातील एका महिला उमेदवाराच्या नातेवाईक तरुणाने दुसऱ्या गटातील तरुणाच्या डोक्‍यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे दुसऱ्या गटातील काही जण धावून आले. त्यामुळे दोन्ही गटांत चांगलीच जुंपली. कंपाउंडच्या कामासाठी आणलेले दगड व विटांचा सर्रास वापर झाल्याने परिसरातील रहिवाशांनीही घरात धाव घेतली. याची माहिती मतदान केंद्रावर गेल्याने देवपूर पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. जमावातील अनेकांनी पळ काढला. 

भोकर येथे सौम्य लाठीमार 
भोकर येथील मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर उमेदवारांतर्फे बूथ लावण्यात आले होते. तेथे विरोधक दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये मतदारांशी बोलण्यावरून दुपारी दोनच्या सुमारास वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. दोन्ही गटांतील शेकडो कार्यकर्ते आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. केंद्रावरून माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली. दरम्यान, परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु त्यामुळे मतदान प्रक्रियेत कुठलीही अडचण आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

लोकसंग्रामचे दोघे अटकेत 
पारोळा (जि. जळगाव) येथील माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या कारच्या काचा फोडून मारहाण केल्या प्रकरणी संशयित व प्रभाग दोनमधील उमेदवार अमोल सूर्यवंशी, भोला गोसावी यांना देवपूर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे (वाणी) यांना दोन दिवसांपूर्वी (ता. 7) शहरातील जयहिंद महाविद्यालयाजवळ लोकसंग्रामच्या पाच ते सहा समर्थकांनी पैसे वाटपाच्या संशयावरून मारहाण केली. अखेर शिरोळे यांनी पारोळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रभाग पाचमधील उमेदवार दिलीप साळुंखे, भोला गोसावी, बंटी देवरे, अमोल सूर्यवंशी, आनंदा पाटील, चिलू (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तो देवपूर पोलिसांकडे वर्ग झाला. पोलिसांनी भोला गोसावी, अमोल सूर्यवंशी यांना अटक केली. 

आमदार गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा 
पारोळा (जि. जळगाव) येथील माजी नगराध्यक्षांना गोविंद शिरोळे यांना मारहाणीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल करू नये, यासाठी देवपूर पोलिस ठाण्यात घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आमदार अनिल गोटे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध देवपूर पोलिसांत काल (ता. 8) रात्री गुन्हा दाखल झाला. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांना मारहाणीनंतर दिलीप साळुंखे यांना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आमदार गोटे व समर्थकांनी देवपूर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. शिरोळे यांना मारहाणीचा गुन्हा दाखल होऊ नये, साळुंखे यांना सोडून देण्यात यावे, अशी घोषणाबाजी केली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हवालदार संदीप अहिरे यांनी देवपूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आमदार गोटे, योगेश मुकुंदे, राजेश केकान, अमोल सूर्यवंशी, भोला गोसावी, योगेश गोसावी, सागर कांबळे, कैलास चौधरी, बंटी देवरे, प्रशांत भदाणे, चिलू (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

अन्सारींच्या घरावर दगडफेक 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी यांच्या घरावर विरोधकांनी आज सायंकाळी सातच्या सुमारास दगडफेक केली. शहरातील प्रभाग 13 मध्ये मतदान प्रक्रियेअंतर्गत काही भागात दुपारी काही जण मतदारांना पैसे वाटप करीत होते, अशी चर्चा पसरली. त्यासंबंधी व्हीडीओ क्‍लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ती क्‍लीप अन्सारी यांच्या समर्थकांकडून व्हायरल झाल्याचा संशय संबंधितांनी व्यक्त केला. त्यावरून सायंकाळी दीडशे ते दोनशे जणांच्या जमावाने अन्सारी यांच्या घरावर चाल केली. जमावातील काही हुल्लडबाजांनी गदारोळ करीत अन्सारी यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांच्या हातात काठ्या, तीक्ष्ण हत्यारे होती. आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत आझादनगर पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते. 

देवपूरमध्ये रोकड जप्त 
देवपूरमधील आयटीआयजवळील परिसरात एक जण आज दुपारी काही मतदारांना पैसे वाटप करीत होता. याबाबत माहिती आचारसंहिता कक्षाला मिळाली. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 70 हजारांची रोकड ताब्यात घेतली असून, रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com