जवानाच्या आत्महत्येबद्दल महिला पत्रकाराविरोधात गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नाशिक - देवळाली कॅम्प येथे जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी दिल्लीतील महिला पत्रकार; तसेच एका निवृत्त जवानाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि लष्कराच्या प्रतिबंधक क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून जवानांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

नाशिक - देवळाली कॅम्प येथे जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी दिल्लीतील महिला पत्रकार; तसेच एका निवृत्त जवानाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि लष्कराच्या प्रतिबंधक क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून जवानांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

मृत जवान रॉय मॅथ्यू यांनी 2 मार्चला लष्करी हद्दीतील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जवानाच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्‍यता व्यक्त करीत चौकशीची मागणी केली होती. मॅथ्यू यांनी एका पडक्‍या खोलीत आत्महत्या केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. गेल्या 7 फेब्रुवारीला दिल्लीतील "द क्विंट न्यूज' वाहिनीची महिला पत्रकार पूनम अग्रवाल हिने निवृत्त जवान दीपचंद याच्या मदतीने लष्करी प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या हेगलाइन महिंद्र इनकोच गार्डन या ठिकाणी विनापरवानगी प्रवेश केला. छायाचित्र वा व्हिडिओ 

चित्रीकरणास मनाई असतानाही पूनमने चित्रीकरण केले. त्याचप्रमाणे रॉय मॅथ्यू आणि इतर जवानांचे चित्रीकरण केले होते. 

हे चित्रीकरण चुकीच्या पद्धतीने 24 फेब्रुवारी 2017 रोजी व्हायरल केले. या चित्रीकरणामुळे रॉय मॅथ्यू तणावाखाली आले आणि दबावापोटी त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर आले. मॅथ्यू यांच्या आत्महत्येनंतर तब्बल 25 दिवसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पूनम अग्रवाल हिची पोलिसांनी घटनेप्रकरणी चौकशी केल्याची चर्चा आहे; परंतु या संदर्भात पोलिसांकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही. 

Web Title: Crime against women about the young journalist's suicide