मद्यपी पित्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

जळगाव- चिंचोली (ता. जळगाव) येथील मद्यपी तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा चोवीस तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियकराच्या मदतीने या मद्यपी तरुणाच्या मुलीनेच आई व बहिणीला सोबत घेऊन पित्याची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दोन्ही मुलींसह त्यांची आई व संशयित प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक केली आहे.

जळगाव- चिंचोली (ता. जळगाव) येथील मद्यपी तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा चोवीस तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियकराच्या मदतीने या मद्यपी तरुणाच्या मुलीनेच आई व बहिणीला सोबत घेऊन पित्याची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दोन्ही मुलींसह त्यांची आई व संशयित प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक केली आहे.

चिंचोली येथील बांधकाम व्यावसायिक तथा बटाईने शेती करणाऱ्या अशोक लक्ष्मण पाटील (वय 47) यांचा काल मृत्यू झाला. नेहमीच मद्यपान करून घरी येताना दुचाकीवरून पडल्याने जखमी होऊन पडला व रात्रभर थंडीत राहिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव त्यांच्या मुलींसह पत्नीने पोलिसांसमोर रचला. दरम्यान, कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना सहाय्यक निरीक्षक सचिन बागूल यांनी विच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्याचे सांगताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. मोठी मुलगी व पत्नी शोभा यांनी शवविच्छेदनास विरोध करून मृतदेह नेल्यास आम्ही स्वतःला पेटवून घेऊ, असा पवित्रा घेतला होता. मात्र श्री. बागूल यांनी कायद्याचा धाक दाखवत अखेर जिल्हा रुग्णालय व तेथून धुळे वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे विच्छेदन केले.

अहवाल येताच तपास सुरू
रात्रीतून प्राथमिक अहवाल येताच संशयितांचा शोध सुरू झाला. निरीक्षक सुनील कुराडे, डीवायएसपी सचिन सांगळे यांनी रात्रभर चौकशी, विचारपूस करून गुन्हा उघडकीस आणला. अखेर संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृताच्या चुलतबहिणीचा पुतण्या राजेंद्र संतोष पाटील (वय 28, रा. नांद्रा) याच्या मदतीने मोठी मुलगी, पत्नी शोभा व लहान मुलगी पूजा यांनी खून केल्याचे पोलिसांत सांगितले असून, चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत अशोकच्या चुलतबहिणीचा पुतण्या रवींद्र संतोष पाटील (वय 28, रा. नांद्रा) हे दोघे बटाईने शेती करीत होते. रवींद्रकडे 22 एकर शेती असून, त्याच नांद्रा शिवारात अशोकची शेती आहे. कमी शेती असल्याने रवींद्रने त्याला दोघे बटाईने शेत घेऊन करू, असा सल्ला दिल्याने दोघांचे बऱ्यापैकी जमत होते. अशातच अशोकच्या मोठ्या विवाहित मुलीचा पती पॅरालिसिसने आजारी असल्याने ती गेल्या दोन वर्षांपासून माहेरीच असल्याने तिचे रवींद्रशी संबंध जुळले होते.

मद्यपी पतीचा नेहमीच त्रास
अशोकला मद्यपानाचे व्यसन असल्याने रात्री पिऊन आल्यावर पत्नी शोभा, भाऊ गणेश (वय 14) यांना तो बेदम मारहाण करीत असे. लहान मुलगी पूजा बाळंतपणासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून माहेरीच होती. 15 डिसेंबरला ती बाळंतीण झाली असून, तीसुद्धा घरीच होती. दोन्ही मुलींसमोर अशोक पत्नी व मुलांना मारत असल्याने त्रासाला कंटाळून त्यांनी अशोकचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

असा केला खून
अशोक रात्री मद्यपान करून तर्रर्र झाल्यावर घरी परतला. त्यानंतर शिवीगाळ, मारहाण करीतच तो झोपला. मुलीने रवींद्रला बोलावून घेतले. अशोकची पत्नी शोभा, मुलगी यांनी तो झोपलेला असलेल्या अंथरुणातील दोन उशा तोंडावर ठेवून त्याचा श्‍वास कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रतिकार प्रचंड असल्याने रवींद्रने लाटणे गळ्यावर दाबून धरल्याने स्वरयंत्र व श्‍वासनलिका तुटून त्याचा मृत्यू झाला.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अशोकची मोठी मुलगी, तिचा मित्र रवींद्र संतोष पाटील, पत्नी शोभा अशोक पाटील (वय 40), पूजा नितीन ढाकणे (वय 25) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू आहे.

Web Title: crime drinking murder