मेहुणबारे: लूट प्रकरणी सहा तरुण ताब्यात 

दीपक कच्छवा
गुरुवार, 3 मे 2018

तरुण चांगल्या कुटुंबातील 
रस्ता लूट करणारे सहाही तरुण चाळीसगावचे रहिवासी असून ते चांगल्या कुटुंबातील आहेत. करन राजेंद्रसिंग राठोड (वय 20), कल्पेश राजेंद्र निकम (वय 20), मयूर रामेश्वर चौधरी (वय 21), कमलेश सुनील पाटील (वय 19), निखिल हिरामण पाटील (वय 19, सर्व रा. चाळीसगाव) व अरुण दामोदर पाटील (वय 20, रा. आदर्शनगर, जालना) अशी त्यांची नावे असून या सर्वांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : लग्नाच्या पत्रिका वाटप करून परतणाऱ्या कुटुंबीयांच्या वाहनाला मद्य प्राशन केलेल्या आठ ते दहा तरुणांच्या टोळीने चाळीसगाव- धुळे महामार्गावरील तिरपोळे फाट्याजवळ रस्ता लुटीच्या उद्देशाने अडवले. मद्यपी तरुणांनी कुटुंबीयांना मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड व दागिने काढून घेतले. महिलांचा विनयभंग केला. रस्ता लूट करणाऱ्या टोळक्‍यातील सहा जणांना ग्रामस्थांनी पकडले. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

मेहुणबारे येथील रहिवासी शेख भोलू शेख उस्मान हे आपल्या कुटुंबीयांसह सोमवारी (30 एप्रिल) सकाळी दहाला मुलगी सना हिच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करीत होते. संगमनेर येथून पत्रिका वाटप करून त्यांच्या ओमनीने (क्रमांक- एमएच 17, व्ही. 3454) मेहुणबारेकडे घरी येण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्या गाडीत भोलू शेख यांचा पुतण्या जावेद शेख, मेहुणी शाजदाबी पठाण व त्यांची दोन मुले मोहम्मद व जुबेर आणि मारिया व निष्का अशा दोन मुली होते. घराकडे परतताना मध्यरात्री दीडच्या सुमारास चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील तिरपोळे फाट्याजवळील गतिरोधकावर त्यांच्या वाहनाचा वेग कमी झाला असता, त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आठ ते दहा तरुणांच्या घोळक्‍याने गाडी बळजबरीने थांबवली. 

गाडी थांबवून तरुणांनी भोलू शेख व त्यांचा पुतण्या जावेद शेख यांना मारहाण केली. त्यांच्यातील एका तरुणाने हातातील दगड भोलू शेख यांना मारून गंभीर दुखापत केली. शिवाय लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. गाडीतील महिला शाहजादाबी यांचे दोन्ही हाथ पकडून त्यांचा बुरखा फाडत विनयभंग केला. त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची मंगलपोत जबरदस्तीने काढून घेतली. महिलेसोबतच्या चारही मुलांना त्यांचे केस पकडत चापटा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार सुरू असताना भोलू शेख यांनी तरुणांच्या विनवण्या केल्या. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी शेख यांच्या खिशातील 45 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. जावेद शेख याला काठ्यांनी मारहाण केली. महिलांसह मुलांचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूला झोपलेले ग्रामस्थ जागे झाले व घटनास्थळी धावतच आले. त्याचक्षणी त्या तरुणांनी तेथून पळ काढला व जवळपासच्या शेतांमध्ये लपून बसले. ही घटना समजताच मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ व उपनिरीक्षक नाजिम शेख यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. शेतात लपलेल्या तरुणांचा ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी शोध घेतला असता, सहा तरुण मिळून आले. उपनिरीक्षक हेमंत शिंदे या प्रकरणाचा तपास  तपास करीत आहेत.

तरुण चांगल्या कुटुंबातील 
रस्ता लूट करणारे सहाही तरुण चाळीसगावचे रहिवासी असून ते चांगल्या कुटुंबातील आहेत. करन राजेंद्रसिंग राठोड (वय 20), कल्पेश राजेंद्र निकम (वय 20), मयूर रामेश्वर चौधरी (वय 21), कमलेश सुनील पाटील (वय 19), निखिल हिरामण पाटील (वय 19, सर्व रा. चाळीसगाव) व अरुण दामोदर पाटील (वय 20, रा. आदर्शनगर, जालना) अशी त्यांची नावे असून या सर्वांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: crime incident in Chalisgaon