मेहुण्यासाठी शालक भोगणार तीन वर्षांचा सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

जळगाव - येथील शाहूनगरातील मटन मार्केटमध्ये सहा वर्षांपूर्वी मटन विक्रेत्यास मारहाण केल्याप्रकरणी दाखल खटल्याचा निकाल लागून दोन संशयितांची निर्दोष मुक्तता, तर एका आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन त्याला तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली. 

जळगाव - येथील शाहूनगरातील मटन मार्केटमध्ये सहा वर्षांपूर्वी मटन विक्रेत्यास मारहाण केल्याप्रकरणी दाखल खटल्याचा निकाल लागून दोन संशयितांची निर्दोष मुक्तता, तर एका आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन त्याला तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली. 

शाहूनगरातील मटन मार्केटमध्ये शेख रऊफ शेख मुनाफ खाटीक यांचे दुकान आहे. १२ डिसेंबर २०१० ला दुपारी तीनच्या सुमारास महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कर्मचारी हुसेन सुपडू भिस्ती (वय ४२, रा. शाहूनगर) दुकानात आला. त्याने खाटीककडे दोन किलो मटनाची मागणी केली. मटन न दिल्यास त्यावर कीटकनाशक टाकण्याची धमकी दिली. मात्र, खाटीक यांनी भिस्तीला मटन देण्यास नकार दिला. त्यातून वादाला सुरवात होऊन हुसेनचे शालक भिस्तीने बाबा भोलू भिस्ती (वय ४२, रा. शाहूनगर), रशीद भोलू भिस्ती (वय ३५, रा. शाहूनगर) भांडणात धावून आले. वाद वाढून हाणामाऱ्या झाल्या.

बाबा भोलू भिस्ती याने लाकडी दांड्याने खाटीक यांच्या चेहऱ्यावर, डोक्‍यावर मारहाण करून खाटीकला गंभीर जखमी केले. जखमी खाटीकने शहर पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक केली.

महत्त्वाच्या साक्ष, पुरावे 
या प्रकरणी न्यायाधीश देवरे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. सरकार पक्षातर्फे ॲड. अविनाश पाटील यांनी फिर्यादी रईस हमीद खाटीक, तपासाधिकारी बळिराम तायडे, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. प्रकाश चित्ते यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदवून घेतल्या, तर आरोपींतर्फे ॲड. एस. जी. उपासनी यांनी काम पाहिले. 

एक दोषी, दोन निर्दोष
मारहाणप्रकरणी न्या. एस. बी. देवरे यांच्या न्यायालयात प्राप्त पुरावे, दस्तऐवज साक्षीदारांच्या साक्षीवरून बाबा भोलू भिस्ती यास कलम-३२४ अन्वये दोषी धरत तीन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम फिर्यादी खाटीक यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले, तर या प्रकरणातील संशयित रशीद भोलू भिस्ती आणि हुसेन सुपडू भिस्ती यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

Web Title: crime in jalgav