वादग्रस्त अभियंत्याशी ‘व्यवहार’ नडला

वादग्रस्त अभियंत्याशी ‘व्यवहार’ नडला

पंधरा दिवसांच्या अंतरात दुसऱ्या मोठ्या कारवाईने खळबळ 
जळगाव - एप्रिल २०१५ मध्ये महासभेत गैरहजर राहणाऱ्या,  विभागाविषयी तक्रारी असल्याने सभेपुढे बोलावूनही न येणाऱ्या तब्बल सहा सहाय्यक अभियंत्यांना महासभेने निलंबित केले होते. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या नगररचना विभागाच्या अभियंत्यांमध्ये या कारवाईवरून खदखद होती. त्यातून बाहेर येण्यासाठी म्हणून लाच देण्या-घेण्याचा हा प्रकार घडला आणि थेट उपायुक्तांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाईची वेळ आली. 

एप्रिल २०१५मध्ये महासभेने निलंबनाचा ठराव केलेल्या या अभियंत्यांमध्ये अरविंद भोसले, गोपाळ लुल्ले, संजय पाटील, योगेश वाणी, सतीश परदेशी, नरेंद्र जावळे आदींचा समावेश होता. गेल्या वर्षभरापासून हे सर्व अभियंते निलंबित असून सर्वांनी घडल्या चुकीबाबत पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष माफी मागीतली होती. त्यानंतर महासभेचा हा ठराव विखंडनासाठी राज्यशासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, त्याआधीच त्यांना सेवेत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरु होते.

...तो वरचा कोण? 
अटक करण्यात आलेले उपायुक्त राजेंद्र बापुसो फातले (वय-४२) यांनी प्रत्येक सहाय्यक अभियंत्याला हजर करवून घेण्याच्या फाईलवर सकारात्मक टिपणीसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. त्यात वरपर्यंत प्रकरण मंजूर करण्याची हमी देण्यात आल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. आपले आणि वरचे असा लाचखोरीचा इमला फातले यांनी रचला होता अशी चर्चा दिवसभर सतरा मजलीत सुरु होती. लाच स्वीकारणाऱ्या उपायुक्तांनी ‘वर’पर्यंत द्यावे लागते, असे या अभियंत्यांना सांगितल्याचे कळते, मात्र तो ‘वरचा’ अधिकारी कोण, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. 

महापालिकेत झाडाझडती 
रिंगरोडवरील ललीत कला भवनच्या मागील खानदेश मिल कॉलनीत उपायुक्तांचे निवासस्थान आहे, येथे सकाळी साडेदहाला सापळा रचून राजेंद्र फातले यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर लगेच लाचलुचपत विभागाचे पथक महापालिकेत धडकले, उपअधीक्षक पराग सोनवणे यांनी आयुक्तांचे दालन गाठले. मात्र आयुक्त नसल्याने त्यांनी राजेंद्र फातले यांचे स्वीयसहाय्यक दीपक जैन यांच्याकडून त्या सहा अभियंत्यांच्या प्रकारणाची फाईल व इतर दस्तऐवज जप्त केले. 

आठव्या दिवशी दुसरा छापा 
आठवडाभरापूर्वीच महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयातील लिपिकांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. समतानगर येथील रहिवासी रवींद्र साईनाथ सुरवाडे (वय-३६) यांच्या निवास्थानाची घरपट्टीची विभागणी करण्यासाठी अशोक बंडू म्हस्के व अशोक बळीराम सैंदाणे या दोघांवर लाच दोन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर लगेच ही कारवाई झाल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com