पीककर्ज वाटपाकडे सर्वच बॅंकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला अशा शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांनी नवीन कर्ज दिलेच नाही. जिल्हा बॅंकेनेही ५० टक्केच कर्ज दिले. दुसऱ्या बॅंकेत कर्ज भरल्यावरही आपल्याकडे कर्ज दिले जात नाही. गेल्या वर्षीपासून अशी स्थिती आहे. शेवटी सावकाराकडून शेतकरी कर्ज काढून शेती करतो, असे विदारक सत्य आहे.
- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती

जळगाव - गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्ज वाटपात सर्वच बॅंकांनी आखडता हात घेतला होता. २०१८-१९ मध्ये खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन हजार ९२२ कोटी नऊ लाख होते. मात्र, प्रत्यक्षात एक हजार १९ कोटींचेच कर्जवाटप झाले.

एकूण टक्केवारीच्या केवळ ३५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बॅंका धजावत नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. जगाचा पोशिंद्यालाच जर कर्ज दिले नाही तर तो कसे धान्य पिकवेल असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

बॅंकांची उदासीनता
कर्जमाफी होण्याचा विषय प्रलंबित असताना शेतकऱ्यांना मदत म्हणून दहा हजारांची मदत राष्ट्रीयकृत बॅंकांनी देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जिल्ह्यात अशी मदत केवळ बोटावर मोजता येतील एवढ्या शेतकऱ्यांना बॅंकांनी दिली. जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा तयार करताना कृषिक्षेत्राचे  बळकटीकरण करण्यासाठी हजारो कोटींचा आकडा बैठकीत बॅंका मांडतात. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वारंवार फिरविले जाते. शेवटी शेतकरी कर्ज न घेता सावकाराकडे वळतो,  असे विदारक चित्र आहे.

निसर्गाचीही अवकृपा
एकीकडे निसर्ग साथ देत असल्याने गेल्या तीनचार वर्षापासून जिल्ह्यात सरासरीच्या अतिशय कमी पाऊस पडतो. दुसरीकडे बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. शासन घोषणांवर घोषणा करते. त्याची  अंमलबजावणी होत नाही. अशा एक ना अनेक कारणांमुळे शेतकरी कंटाळून जीवन संपवतो. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर बॅंका किमान या हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop Loan Distribution Bank