MSEB News : पिंपळनेरमध्ये थकीत वीज बिल वसुलीचा धडाका; कोट्यावधींची थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB News

MSEB News : पिंपळनेरमध्ये थकीत वीज बिल वसुलीचा धडाका; कोट्यावधींची थकबाकी

म्हसदी : महावितरणच्या पिंपळनेर उपविभागात कोट्यवधी रुपयांची वीज देयके थकीत आहेत. केवळ पिंपळनेर उप विभागात सर्व प्रकारच्या १९ हजार ९२२ ग्राहकांकडे ४९६ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती पिंपळनेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार, येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार यांनी दिली.

कर्मचाऱ्यांनी वीजदेयक वसुलीचा धडाका लावला असून थकबाकीदार ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी मेगा फोनद्वारे आवाहन केले जात आहे.

ग्राहकाभिमुख सुविधांसाठी वीजग्राहकांनी तत्काळ थकबाकी भरत कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंतासह स्थानिक वीज कर्मचारी घरोघरी जाऊन आवाहन करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीच्या वसुलीचे आदेश दिले असल्याने वीज बिल वसुलीचा धडाका लावला आहे. एकट्या पिंपळनेर विभागात सर्वच प्रकारच्या १९ हजार ९२२ ग्राहकांकडे तब्बल ४९६ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.

महावितरणच्या कृषी पंप असो वा घरगुती ग्राहक ज्यांच्याकडे वीजबिल थकीत अशा थकबाकीदार ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही वरिष्ठांनी दिल्या आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी थकबाकी भरावी अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिला आहे.

थेट मेगा फोनद्वारे आवाहन

ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीचे स्थानिक कर्मचारी कंपनीचे दैनंदिन काम सांभाळून मेगा फोनद्वारे वीजदेयके भरण्याचे आवाहन करत आहेत. पिंपळनेर विभागाचे मुख्य तंत्रज्ञ एम. जी. बागूल, वरिष्ठ तंत्रज्ञ जगदीश देसले, तंत्रज्ञ धनंजय बागूल आदी कर्मचारी मेगा फोनद्वारे वीजदेयके भरण्याचे आवाहन करत होते. मेगा फोनच्या माध्यमातून ग्राहकांचे लक्ष वेधले जावे हा हेतू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

पिंपळनेर विभागातील सर्व प्रकारचे वीजग्राहक

(कंसात थकबाकीदार ग्राहक‌ व थकबाकी)

घरगुती ग्राहक - ५११९ , थकबाकी ३६लाख ११हजार.

------------

व्यावसायिक ग्राहक -३७८, थकबाकी ११ लाख ५५ हजार.

----------

औद्योगिक ग्राहक - ७३, थकबाकी ३ लाख ६० हजार.

----------

सार्वजनिक सेवा ग्राहक -७५, थकबाकी ४ लाख ६३ हजार.

---------

कुक्कुटपालन ग्राहक ४६, थकबाकी ५३ हजार.

----------

शेती पंप ग्राहक १३ हजार ९१५, थकबाकी ३८९ कोटी ४७ लाख.

---------

सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक १४५, थकबाकी १५ कोटी ९५ लाख.

--------

पथदीप ग्राहक १७१, थकबाकी ३४ लाख, ५४ हजार.

''वीज पंपाच्या एक रक्कमी देयके भरणाऱ्या थकबाकीदार शेतकरी ग्राहकांना तीस टक्के सवलत दिली जाणार आहे. सर्वच थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे.'' --दिनेश पवार, उपकार्यकारी अभियंता, पिंपळनेर उपविभाग

टॅग्स :DhuleMSEBelectricity bill