'सीएस'च्या नवीन अभ्यासक्रमात कॉर्पोरेट मॅनेजमेंट अकाउंटिंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नाशिक - कंपनी सेक्रेटरी (सीएस) अभ्यासक्रमात यंदा आमूलाग्र बदल करण्यात आले असून, विविध कायद्यांतील दुरुस्तीचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आला आहे. परीक्षेच्या स्वरूपातही अंशतः बदल केले आहेत. तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेल्या या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात, अर्थात "एक्‍झिक्‍युटिव्ह'मध्ये आता सातऐवजी आठ विषय असतील. नवीन अभ्यासक्रमात "कॉर्पोरेट मॅनेजमेंट अकाउंटिंग'वर भर असेल.

चार्टर्ड अकाउंटंट (सीए)च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. भारतीय कंपनी सचिव संस्थेतर्फे सीएस अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला. दर वर्षी जून व डिसेंबरमध्ये परीक्षा होत असल्याने जून 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षा नवीन 2017 पॅटर्ननुसार होणार आहे. मात्र, यापूर्वी फाउंडेशन, एक्‍झिक्‍युटिव्ह किंवा प्रोफेशन यापैकी कुठल्याही वर्गात असलेले विद्यार्थी यापूर्वीच्या 2012 च्या पॅटर्ननुसार परीक्षा देऊ शकतील. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. 1 एप्रिल 2018 नंतर नोंदणी करणाऱ्या, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसारच परीक्षेला समोरे जावे लागणार आहे. नवीन अभ्यासक्रमात विषयांच्या नावात बदल केला आहे. सोबत कायद्यातील दुरुस्तींचा अंतर्भावदेखील या विषयांत केला आहे. परीक्षेची पद्धत पूर्वीप्रमाणे असणार आहे. मात्र, यापूर्वी काही विषयांसाठी परीक्षेचे स्वरूप बदलले असून, यापुढील परीक्षांत वस्तुनिष्ठ प्रश्‍नांऐवजी विस्तृत स्वरूपात उत्तर लिहावे लागणार आहे.

'एक्‍झिक्‍युटिव्ह' परीक्षेत महत्त्वाचे बदल
फाउंडेशनची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होणारे विद्यार्थी एक्‍झिक्‍युटिव्ह या परीक्षेसाठी पात्र होत असतात. यापूर्वी या परीक्षेत सात पेपर होत होते. मात्र, त्यात एका विषयाची भर पडली असून, यापुढे विद्यार्थ्यांना आठ विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या वाढीव विषयांत कंपनीची नोंदणी प्रक्रिया, तसेच कंपनी बंद करायची असेल, त्यासाठी आवश्‍यक प्रक्रिया कशी असते, विविध परवानग्या कशा मिळवायच्या असतात, याबद्दल विस्तृत अभ्यास होणार आहे. प्रोफेशनल या अंतिम टप्प्यातील परीक्षेत पूर्वीप्रमाणे नऊ विषयांचा समावेश असेल.

Web Title: CS new syllabus corporate management accounting