चलनस्थिती पूर्वपदावर येण्यास 15 महिने लागणार

विनोद बेदरकर
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

"मुद्रणालयांचे विस्तारीकरण तातडीच्या स्थितीत शक्‍य नाही. देशभरातून कमाल क्षमतेने नोटांची छपाई हाच पर्याय असून, चलन रिप्लेसमेंटला शासनाचे प्राधान्य आहे.'

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ.

चलनस्थिती पूर्वपदावर येण्यास 15 महिने लागणार
नाशिक - नोटबंदीच्या घोषणेने देशातील सात हजार सातशे कोटींच्या नोटा बाद झाल्या. देशभरातील मुद्रणालयांची वार्षिक मुद्रणक्षमता 2600 कोटी नोटा आहे. यात दोन हजारांची नोट गृहीत धरल्यावरही बाद झालेल्या देशातील सबंध नोटांच्या रिप्लेसमेंटसाठी किमान पंधरा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत रिझर्व्ह बॅंकेच्या देशभरातील करन्सी चेस्टसमोर बॅंकांची, तर बॅंका व एटीएम केंद्रांसमोर नागरिकांच्या रांगा कमी होण्याची शक्‍यता नाही.

पंतप्रधानांनी पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेस उद्या (ता. 8) महिना पूर्ण होत आहे. शासनाच्या अपेक्षेनुसार आणखी पन्नास दिवस जनतेने दिल्यास काळ्या पैशावर नियंत्रण आणि अर्थपुरवठा सुरळीत होईल. प्रत्यक्षात केंद्रीय अर्थ मंत्रालय स्तरावरील नियोजन, पाठपुरावा तसेच मुद्रणालयांची क्षमता विचारात घेतल्यास पन्नास दिवसांनीही स्थिती "जैसे थे' राहण्याचीच भीती आहे. बाद केलेल्या चलनात एक हजाराच्या 3000 कोटी (39 टक्के) आणि पाचशेच्या 4700 कोटी (61 टक्के) नोटा आहेत. त्यांचे एकंदर चलनातील प्रमाण 80 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. हे सर्व चलन रिप्लेस करण्यास देशातील मुद्रणालयांची वार्षिक 2600 कोटी नोटा क्षमतेनुसार सामान्यतः पावणेतीन वर्षे कालावधी लागेल. दोन हजारांच्या नोटेमुळे त्यांचे बाह्य मूल्य वाढल्याने नोटांची संख्या कमी झाली. त्याने हा कालावधी पंधरा महिन्यांवर येईल.

छपाईचा प्रश्‍न
येथील मुद्रणालयांची कमाल कार्यक्षमता लक्षात घेता अपवादात्मक स्थितीत वार्षिक 220 ते 240 कोटी नोटांची छपाईही झाली आहे. नाशिकचे दैनंदिन 15 दशलक्ष, देवास (मध्य प्रदेश) 7 दशलक्ष विचारात घेतल्यास सर्व रजा रद्द केल्यावरही पंचवीस टक्के कार्यक्षमता वाढू शकते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियंत्रणाखालील म्हैसूर (कर्नाटक), सालबोनी (प. बंगाल) यांच्याकडून कमाल एक हजार कोटी नोटांची छपाई शक्‍य होईल. अशा स्थितीत एकंदर आठशे कोटी नोटांचा तुटवडा भरून काढण्यासाठी काय उपाययोजना होतात यावर सरकार व जनता दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

चाळीस कोटी नोटांची रद्दी
सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाविषयीच्या आक्षेपांत नियोजनाचा अभाव हा मुद्दा आहे. याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधानांनी रात्री आठला घोषणा केली. परंतु नाशिकला पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई 8 नोव्हेंबरला रात्री सव्वा बारापर्यंत सुरूच होती. एकंदर चाळीस दशलक्ष नोटांची छपाई झाली होती. घोषणेनंतर त्याच्या छपाईचा खर्च व श्रम वाया गेलेच मात्र या चाळीस कोटी नोटांची छपाई यंत्रातून बाहेर पडल्यावर लगेचच रद्दी झाली.

Web Title: currency 15 months have come to be reinstated