वाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’

Cyber-Crime
Cyber-Crime

जळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या चार वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यभरात चारपट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तंत्रज्ञांसह सुसज्ज तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सायबर क्राइमचे मोठे आव्हान  पोलिस दलापुढे आहे. म्हणायला दोन महिन्यांपूर्वी सायबर पोलिस ठाणे सुरू झाले असले तरी ही यंत्रणा ‘अपडेट’ नसल्याने पारंपरिक पोलिसिंगची अशाप्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासात दमछाक होत आहे.

या गुन्ह्यांचे जिल्ह्यात प्रस्थ
अमुक बॅंकेतील मॅनेजर बोलतोय... तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे... सेवा पूर्ववत एटीएम-पिनकोड पासवर्ड सांगा... अशी विचारणा करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दररोज घडताय. या प्रकरणात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल, इतर सरकारी बॅंकांचा नंबर लागतो. ज्येष्ठ नागरिक, महिला या गुन्हेगारांचे मुख्य लक्ष्य ठरतात. ऑनलाइन खरेदीतील तक्रारींशिवाय जॅकपॉट लागणे, नोकरीचे आमिष देणे, बक्षीस लागणे आदी प्रलोभने देऊन लाखोंचा गंडा घातला जातो. विदेशात नोकरीच्या नावावर लुबाडणुकीचेही बरेच प्रकार आहेत. फेसबुक, व्हॉटस्‌ॲपद्वारे अश्‍लील संदेश पाठवणे, महापुरुषांबद्दल, मोठ्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण व त्याचे आदान प्रदानाच्या तक्रारीही आहेत. 

सायबर सेलचे झाले ठाणे
सन २०१६मध्ये महाराष्ट्र सायबर प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे ६५० कोटी रुपये खर्च करून एकाचवेळी ४७ सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित केल्याचा गवगवा झाला. जळगाव जिल्ह्यात दोन वर्षानंतर अर्थात-२०१८ च्या सप्टेंबर महिन्यात मुहूर्त साधला गेला. तत्पूर्वी गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत ‘सायबर सेल’ गेल्या नऊ वर्षांपासून कार्यरत होती. आता स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्यात आले असून निरीक्षक अरुण निकम, उपनिरीक्षक अंगद नेमाने, यांच्यासह अकरा पोलिस कर्मचारीवर्ग मंजूर करण्यात आला आहे. उपलब्ध साधन सामग्री आणि प्रशिक्षणाच्या जोरावर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोनच महिन्यात चार मोठ्या गुन्ह्यांची उकल केली असून फसवणुकीच्या गुन्ह्यातील चार तक्रारींमध्ये ४८ तासांत रक्कम परत मिळवून दिल्याची कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल. 

कालबाह्य यंत्रणा
महाराष्ट्र पोलिस दलाला सीडॅककडून पुरविण्यात आलेल्या टुल्सपेक्षा कितीतरी पटीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आजमितीस सायबर गुन्हेगाराकडून करण्यात येत आहे. या कुशल आणि पारंगत गुन्हेगारांना ट्रॅक करण्यासाठी सीडॅकच्या टूल्स आणि उपकरणांना मर्यादा येतात. परिणामी, आभासी जगतातील हे गुन्हेगार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची उकल होण्यापूर्वीच अटकेपार होतात. 

सव्वाचार लाख केले परत
जिल्हा पोलिस दलाच्या सायबर सेलकडे गेल्या वर्षी सायबर क्राइम संदर्भात-१२०(वर्ष-२०१७)  तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तुलनेत गेल्या १० महिन्यांत १४०च्यावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झालेली असून दाखल ६० प्रकरणांमध्ये नागरिकांची २२ लाख  ७ हजार ६३४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झालेली आहे. यापैकी सायबर सेलने प्रकरणांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे ४ लाख २८  हजार ९०० रुपये परत मिळवून दिले आहेत.

४८ तासांच्या आत तक्रार करा 
ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर ४८ तासांत नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा जिल्हा पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शाश्वती असते. अशा प्रकारे तक्रार केल्यास सायबर पोलिस ठाण्यामार्फत संबंधित बॅंकेला, संस्थेला किंवा ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या कंपन्यांना तत्काळ मेल पाठवून व्यवहार थांबवण्यात येतो. परिणामी फसवणूक करणाऱ्या भामट्याला ती रक्कम काढता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर ४८ तासांच्या आत तक्रार द्यावी. तत्पूर्वी शक्‍य तितक्‍या लवकर संबंधित बॅंकेला टोल फ्री क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष जाऊन खाते ब्लॉक करून घ्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com