विरोधकांच्या जागांपेक्षा धरणे, खेकड्यांची काळजी घ्या - बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला किती जागा मिळतील, याची काळजी करण्यापेक्षा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील असुरक्षित धरणे आणि त्यांना पोखरणाऱ्या खेकड्यांची काळजी घ्यावी, असा सल्ला कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

नाशिक - आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला किती जागा मिळतील, याची काळजी करण्यापेक्षा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील असुरक्षित धरणे आणि त्यांना पोखरणाऱ्या खेकड्यांची काळजी घ्यावी, असा सल्ला कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात यांचा रविवारी सर्वप्रथम नाशिकला सत्कार झाला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी त्र्यंबकेश्‍वर येथे ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले, तसेच दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राला भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात कॉंग्रेस व आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत झाले. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, गटनेते शाहू खैरे, हेमलता पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

वेळ कमी, जबाबदारी जास्त
थोरात म्हणाले, की निवड होऊन 24 तास होण्यापूर्वीच नाशिकला उत्साहात स्वागत होत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह असाच ठेवून भाषण व जाहिरातीच्या भूलथापा देणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी कामाला लागावे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. वेळ कमी आहे. कॉंग्रेसने मोठी जबाबदारी सोपविली आहे. लहान-थोर कार्यकर्ते, धर्मनिरपेक्ष विचारांवर श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करायचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अर्धा तास आधीच आतषबाजी
थोरात यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होताच, तसाच उत्साह स्वागतावेळीही पाहायला मिळाला. सायंकाळी साडेसातलाच शासकीय विश्रामगृहासमोर स्वागताचे फलक लागले आणि फटाक्‍यांची आतषबाजीही करण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासाने श्री. थोरात विश्रामगृहात दाखल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dam Crab Care BJP Balasaheb Thorat Politics