दमणगंगेचे पाणी पेटले

नाशिक - महाराष्ट्र-गुजरातच्या पाणीप्रश्‍नामुळे चर्चेत आलेली दमणगंगा नदी.
नाशिक - महाराष्ट्र-गुजरातच्या पाणीप्रश्‍नामुळे चर्चेत आलेली दमणगंगा नदी.

नाशिक - महाराष्ट्र-गुजरातच्या पाण्याविषयी सुरू असलेल्या संघर्षाने आता नवीन वळण घेतले असून, दमणगंगा नदीच्या उगमस्थानाजवळ पाणी पेटले आहे. आमच्या पुनर्वसनाचे अन्‌ हक्काच्या पाण्याचे पहिल्यांदा बोला, गुजरातसाठी आमचे पाणी देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे म्हणत आदिवासींनी पहिल्यांदा वज्रमूठ आवळली. हनुमंतपाडा, उस्तळे, गोंदे, निरगुडे, एकदरे, उंब्रद, बर्डापाडा, गडदुणे, कोटंबी, देवगावचे ग्रामस्थ आणि शेतकरी उद्या (ता. २३) सकाळी पेठ तहसील कार्यालयात मोर्चाद्वारे एकत्र येत सरकारला जाब विचारणार आहेत.

दमणगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत एकदरे धरण होणार आहे अथवा नाही याबाबत आमच्या भागात संभ्रम आहे. त्यामुळे प्रत्येक गावात बैठक घेऊन प्रकल्पाबाबत आणि आमची घरे व शेतजमिनीबाबत काय धोरण स्वीकारले, याचा खुलासा करण्याची मागणी आदिवासींनी केली आहे. प्रकल्पांतर्गत नेमकी कोणती गावे आहेत, किती जणांची घरे-शेतजमीन जाणार आहे याची माहिती आदिवासींना नाही. सर्वेक्षणाव्यतिरिक्त यंत्रणेतील कुणीही या भागाकडे अद्याप फिरकलेले नाही. ऐन उन्हाळ्यामध्ये आदिवासींमध्ये असंतोषाचा डोंब उसळला आहे. त्यातून दमणगंगा धरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची स्थापना झाली असून, त्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

८६० कोटींचा प्रकल्प
एकदरे या प्रस्तावित धरणापासून पाच किलोमीटरवर दमणगंगा नदीचे उगमस्थान आहे. एकदरे धरण पाच हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे असून, हे पाणी २१८ मीटर उचलून चिरा डोंगरावर आणले जाईल. इथून साडेपाच किलोमीटरच्या बोगद्यातून गंगापूर धरणात पाणी जाईल. ८६० कोटींच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. याशिवाय पेठ तालुक्‍यात पार नदीवर झरी धरण प्रस्तावित असून, त्याचे पाणी गुजरातकडे जाणार आहे.

आदिवासींच्या मागण्या
    पाण्यावाचून वंचित पेठमधील औद्योगिक वसाहतीला पाणी द्या. 
    स्थानिकांचा पाण्यावरील हक्क अबाधित ठेवा. 
    धरणाच्या कामापूर्वी पुनर्वसन करा. 
 सरकारी नोकऱ्यांमध्ये कुटुंबातील एका सदस्याला सामावून घ्या.

धरमपूर-नाशिक महामार्गाच्या जमिनीसाठी सोळा लाख रुपये एकर असा भाव देण्यात आला. पण नदीजोड प्रकल्पांतर्गत इथल्या २८ ते ३० हजार एकरी एवढे बाजारमूल्य आणि चारपट भाव म्हटले, तरीही एकरी सव्वा लाखाच्या आसपास देऊन शेतजमिनीचे अधिग्रहण ही बाब स्थानिकांना मान्य नाही. त्यातच पुन्हा आदिवासी कुटुंबाकडे तीन ते चार एकरांपेक्षा अधिक जमीन नाही. त्यामुळे आदिवासी भूमिहीन होणार आहेत. सरदार सरोवर, उकई धरणाप्रमाणे आम्हाला वाऱ्यावर सोडले जाऊ नये, अशी आदिवासींची मागणी आहे.
- डॉ. प्रशांत भदाणे, दमणगंगा धरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com