शहरातील धोकादायक वाडे पोलिस बंदोबस्तात उतरविणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

जीवितहानी टाळण्यासाठी वाडे, इमारतींचा धोकादायक भाग नागरिकांनी परस्पर सहकार्याने उतरवून घ्यावा अन्यथा पोलिसांच्या मदतीने महापालिका ते काम करेल.
- राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

नाशिक - पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची नोटीस गुरुवारी (ता. ४) प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकीकडे धोकादायक वाडे उतरविण्याचे आवाहन करतानाच दुसरीकडे दुर्घटना घडल्यास जबाबदार राहणार नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे.

यंदा पावसाला उशिरा सुरवात झाली असली तरी मुसळधारेने राज्यात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत आहेत. पुणे, कल्याण, मुंबई येथे सीमाभिंत कोसळून जीवितहानीच्या घटना घडल्या. बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने गावे वाहून गेले. नाशिक शहरात यंदाच्या पावसाच्या हंगामात तीन वाडे कोसळल्याची घटना घडली. सर्वांत मोठी घटना सातपूर विभागातील ध्रुवनगर भागातील सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ योजनेतील पाण्याची टाकी पडून चौघा कामगारांचा मृत्यू झाला. सातत्याने घडणाऱ्या जीवितहानीच्या घटनांनी महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात अनपेक्षित ठिकाणी घटना घडत असल्या तरी सर्वाधिक धोका वाड्यांचा असल्याची बाब प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. किरकोळ पावसाने शहरात दुर्घटना घडत असेल तर मुसळधार पावसाने धोका अधिक वाढला असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने गुरुवारी जाहीर नोटिशीच्या माध्यमातून धोकादायक वाडेधारकांना इशारा दिला आहे. धोकादायक वाडे किंवा भाग नागरिकांनी स्वतः उतरवून घ्यावा अन्यथा पोलिसांच्या मदतीने उतरविला जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे. धोकादायक वाडे, इमारतीत वास्तव्य करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महापालिकेची राहणार नसल्याचेही दुसरीकडे स्पष्टीकरण देत दुर्घटना घडल्यास त्यातून कायदेशीर पळवाट काढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous Wada Police Bandobast Crime