यासाठी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही..

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

अरुण कंक यांना गेल्या शुक्रवारी (ता. ८) पोट दुखू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी (ता. ११) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. ज्या ठिकाणी अरुण कंक हे सुरक्षारक्षक होते त्याठिकाणी त्यांना मारहाण केल्याचा आरोप नातलगांनी केला असून, याप्रकरणी संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

नाशिक : त्र्यंबक रोडवरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सुरक्षारक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृताच्या नातलगांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, पोलिसांनी नातलगांची समजूत काढत मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर कारवाईचे आश्‍वासन दिले. 

उपचारादरम्यान मृत्यू; नातलगांचा गोंधळ 
अरुण गोपाळ कंक (वय 36, गणेशवाडी, नाशिक) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. अरुण कंक यांना गेल्या शुक्रवारी (ता. 8) पोट दुखू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी (ता. 11) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. ज्या ठिकाणी अरुण कंक हे सुरक्षारक्षक होते त्याठिकाणी त्यांना मारहाण केल्याचा आरोप नातलगांनी केला असून, याप्रकरणी संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मालकाने अरुण कंक यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला होता. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, अशी समजूत पोलिसांनी काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.  जिल्हा रुग्णालयात अरुण कंक यांचे शवविच्छेदन करण्यात येऊन व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death during treatment;Relatives did not take the death body at Nashik