उड्डाणपुलाखाली 'तो' भोगत होता मरणयातना.. पण त्यानंतर..

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सोमनाथ बोराडे यांनी त्यांची विचारपूस केली असता संतोष काशीनाथ सोनवणे असे त्यांनी सांगितले. मात्र नातेवाइकांची काहीही माहिती दिली नाही. वेदनेने मात्र ते शब्दाशब्दाला विव्हळत होते आणि आपला डावा हात झाकत होते. फक्त "साहेब, मरणाच्या यातना होत आहेत, आता यातून फक्त सुटका करून द्या,' अशी विनवणी करत होते. उत्सुकता म्हणून बोराडे यांनी हातावरचा कपडा दूर केल्यानंतर ते अक्षरशः सुन्न झाले.

नाशिक : अनेक दिवस पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाखाली हातापायाचे मुटकुळे करून पडलेला आणि हालचाल करतोय म्हणून जिवंत म्हणावा असा देह. शेकडो लोकांची रोज होणारी ये-जा, मात्र कुणालाही दखल घ्यावी असे कधीच वाटले नाही. अंगात मळलेले कपडे, दाढी वाढलेली, कुणी काही दिलेच तर एक हात झाकून दुसऱ्या हाताने पदरात पाडून घेऊन खाणे. जवळच असलेल्या महापालिकेच्या गळक्‍या व्हॉल्व्हवर पाणी पिणे आणि तेथेच पडून राहणे. माणसाच्याच राज्यात एका माणसाची होत असलेली ही वाताहत. मराठा सोशल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ बोराडे यांचे लक्ष या व्यक्तीकडे गेले आणि तिचे जीवनच बदलून गेले. 

उड्डाणपुलाखाली जगणाऱ्या माणसाला मराठा फाउंडेशनतर्फे मदतीचा हात 

सोमनाथ बोराडे यांनी त्यांची विचारपूस केली असता संतोष काशीनाथ सोनवणे असे त्यांनी सांगितले. मात्र नातेवाइकांची काहीही माहिती दिली नाही. वेदनेने मात्र ते शब्दाशब्दाला विव्हळत होते आणि आपला डावा हात झाकत होते. फक्त "साहेब, मरणाच्या यातना होत आहेत, आता यातून फक्त सुटका करून द्या,' अशी विनवणी करत होते. उत्सुकता म्हणून बोराडे यांनी हातावरचा कपडा दूर केल्यानंतर ते अक्षरशः सुन्न झाले. संपूर्ण हात जखमांनी भरलेला. जखमा इतक्‍या खोल की अक्षरशः त्यात अळ्या आणि किडे पडलेले. परिस्थिती बघून बोराडे यांनी फाउंडेशनचे सदस्य माजी नगरसेवक दिलीप दातीर, संजय नवले, गोरख कोंबडे, बाळासाहेब जाधव, समाधान गोडसे, दत्ता मोरे, संजय चांदगुडे, अजय गुप्ता, मार्गदर्शक शिवाजी चुंभळे यांना याबाबत माहिती दिली. सर्वांनी लगेच संतोष यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

Image may contain: 1 person, beard and indoor

सर्वच सदस्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले 

लगेच नवे कपडे आणून त्यांना देण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यांनीही लगेच घेऊन या, असा निरोप दिला. त्यामुळे तातडीने सोनवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताची परिस्थिती पाहून जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर आणि कर्मचारीही हेलावून गेले होते. उपस्थित सर्वच सदस्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते. त्यांच्यावर तातडीची सुश्रूषा करण्यात आली असून, मंगळवारी (ता. १२) सोनवणे यांच्या सर्व तपासण्या करून योग्य ते उपचार तातडीने करणार असल्याचे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. ते जोपर्यंत पूर्णतः बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या जेवणाचा, इतर औषधांचा आणि खानपाण्याचा सर्व खर्च फाउंडेशनतर्फे करणार असल्याचे बोराडे यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From death man received life support at Nashik News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: