तुटलेल्या बांगडीपासून साकारल्या शोभेच्या वस्तू

दीपक कच्छवा
रविवार, 28 जुलै 2019

मेहुणबारे येथील ८२ वर्षीय नानासाहेब वाघ यांची कला पोहचली जगभरात​

ःमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बाजरीच्या भाकरीची शिदोरी सोबत घेऊन देशाच्या संरक्षण विभागात काम करून गुजराण करणाऱ्या येथील नानासाहेब वाघ यांनी तुटलेल्या बांगडीच्या काचेपासून विविध शोभेच्या वस्तू तयार करण्याची कला आत्मसात केली आहे. आपल्या कलेचे प्रदर्शन विदेशासह संपूर्ण भारतात केले आहे. सुमारे सहा दशकांपासून आपले गाव सोडलेल्या या कलाकाराने वयाच्या ८२ व्या वर्षीही ही कला जोपासली असून आजही ते तुटलेल्या बांगडीपासून शोभेच्या विविध वस्तू साकारत आहेत.

घरातील बऱ्याच वस्तू जुन्या झाल्या, की आपण त्या फेकून देतो. विशेषतः काचेची वस्तू फुटली तर तिचा उपयोग होत नसल्याने त्या कचराकुंडीतच जातात. येथील रहिवासी व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले नानासाहेब वाघ यांनी मात्र गेल्या ५५ वर्षांपासून अशा टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचा छंद वयाच्या ८२ व्या वर्षीही जोपासला आहे. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल, असा काहीसा आहे. सध्या त्यांना वयोमानामुळे कमी ऐकू येत असले, तरी आजही त्यांनी आपली कला जोपासली आहे. 

काचेच्या विविध वस्तू 
नानासाहेब वाघ यांनी ही कला आपल्या पुढच्या पिढीकडेही सोपवली आहे. त्यांचे चिरंजीव अतुल वाघ हे ही कला जोपासत आहेत. तुटलेल्या काचेच्या बांगड्यांपासून आकर्षक शोभेच्या वस्तू ते तयार करतात. वेगवेगळे पक्षी, प्राणी, हरणाच्या विविध भावमुद्रा त्यांनी बांगड्या व काचेच्या रॉडपासून तयार केल्या आहेत. काचेचा रॉड ते उत्तरप्रदेशातून मागवतात. तुटलेल्या बांगड्यांपासून विविध वस्तू तयार करण्यात ते सतत मग्न असतात. 

कलेची वाट सोडली नाही 
नानासाहेब वाघ हे शेतकी महाविद्यालयात असताना काचेच्या वस्तू तयार करायला शिकले. कालांतराने त्यांना संरक्षण खात्यात नोकरी मिळाली. या काळात त्यांना त्यांची ही कला जोपासता आली नाही. मात्र, त्यांनी कलेची वाट सोडली नाही. बऱ्याचदा आठ- आठ तास काम करून वस्तू ते तयार करायचे. काचेला गॅसवर तापवून त्याला विविध आकार देऊन ते वस्तू तयार करतात. सुरुवातीला लोहाराच्या भात्यावर तसेच रॉकेलच्या दिव्यावर ते वस्तू तयार करायचे. कालांतराने त्यात बदल होत आता छोट्या गॅसच्या साहाय्याने ते वस्तू तयार करू लागले. त्यांना या कार्यात आजही त्यांच्या पत्नी अरुणाबाई वाघ, मुलगा अतुल, अमोल, सूनबाई आरती यांच्यासह नातवंडे प्रोत्साहन देत असतात, असे अतुल वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

पाच देशात प्रदर्शन 
नानासाहेब वाघ यांच्या काचेच्या विविध वस्तू केवळ भारतातच नव्हे तर पाच देशात पोचल्या आहेत. पॅरिस, स्वित्झर्लंड, ईथोपिया, सिंगापूर व श्रीलंका या देशांमध्ये त्यांच्या वस्तू तयार करण्याचे प्रदर्शन कौतुकाचा विषय बनले होते. भारतात पुणे, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली यासारख्या अनेक ठिकाणी त्यांच्या बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. नानासाहेब वाघ हे यशस्वी जादूगार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मूळचे मेहुणबारे गावातील असलेल्या नानासाहेबांमुळे गावाच्या लौकिकात मोलाची भर पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decorative items created from broken bangles