घटली शहरातील गुन्हेगारी..   

gunhegari.jpg
gunhegari.jpg

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून गुन्हेगारीला स्थान नसल्याचे सांगत, पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी मोडीत काढली आहे. चालू वर्षात आत्तापर्यंत 15 खूनाच्या घटना घडल्या असून यात एकही घटना गुन्हेगारी टोळीशी संबंधित नाही. तसेच गतवर्षाच्या तुलनेमध्ये यात घट दिसून आली आहे. त्याचप्रमाणे, गतवर्षाच्या तुलनेमध्ये अपघाती मृत्युमध्ये 34 घट नोंदली गेली आहे. यंदा 115 जणांचा अपघाती बळी गेला असून गतवर्षी 149 जण दगावले होते. 
  
हद्दीतून 41 गुन्हेगारांची तडीपारी 
पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार घेतला. त्याचवेळी त्यांनी शहरात गुन्हेगार आणि गुन्हेगारीला स्थान राहणार नाही असे स्पष्ट केले होते. गुन्हेगारांवर नांगर फिरविण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना राबविताना, टवाळखोरांच्या कारवाईपासून प्रारंभ केला. तसेच, दोनपेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असलेल्यांवर थेट तडीपारीची कारवाई केली. त्यामुळे शहरातील जुन्या गुन्हेगारी टोळ्या आणि नव्याने उदयास आलेल्या टोळ्यांच्या मुसक्‍या आवळल्या गेल्या आहेत. 

चोरटयांच्या टोळीवरही मोक्‍काअन्वये कारवाईचे संकेत

पोलीस आयुक्तालय हद्दीतून 41 गुन्हेगारांची तडीपारी केली गेली आहे. तर अद्यापही काही गुन्हेगारांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याचप्रमाणे, एमपीडीए अंतर्गत 10 सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. मोक्काअन्वये एका टोळीवर कारवाई केली आहे तर एका टोळीचा प्रस्ताव आहे. याचप्रमाणे, मुथूट फायनान्स, सोनसाखळी चोरटयांच्या टोळीवरही मोक्‍काअन्वये कारवाईचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. 
 
गॅंगवॉरमधून खून नाहीच 
गेल्या नऊ महिन्यांत शहरात 15 खून झाले आहेत. यात एकही खून राजकीय वा गुन्हेगारी कृत्यातून झालेले नाहीत. पती-पत्नीच्या वादातून 4, अनैतिक प्रेमसंबंधातून 2, अंतर्गत किरकोळ वादातून 5, कुरापतीतून 1 तर अन्य काही कारणातून 3 असे 15 खूनाचे गुन्हे दाखल आहेत. विशेषत: या 15 खूनाच्या गुन्ह्यांची उकलही झालेली आहे. गेल्या 2018 मध्ये 8 महिन्यात 21 खून झाले होते. 
 
अपघाती मृत्यु 34 ने घटले 
शहरातील रस्ता अपघातांचे प्रमाण राज्यभर वाढत असताना, नाशिकमध्ये मात्र हे प्रमाण कमी होते आहे. 2017च्या तुलनेत 2018मध्ये प्रमाण घटले होते. त्याचप्रमाणे 2019मध्ये ही प्रमाण 34 ने घटले आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये 115 जणांचा बळी रस्ता अपघातात गेला असून 2018 मध्ये 149 जण दगावले होते. वाहतूक शाखेची जनजागृती आणि सकारात्मक कारवाईचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे. 

 
गुन्हे                    2018  2019 
खून                      21     15 
जीवघेणा हल्ला       36     47 
बलात्कार              31     37 
दरोडा                  06     12 
चैनस्निँचग             50     43 
घरफोडी (दिवसा)  33     21 
घरफोडी (रात्री)    135    156 
दुचाकी चोरी        374    346 
अपघाती मृत्यु      149    115 

प्रतिक्रिया 
गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरक्‍यांसह साथीदार तडीपार आहेत वा काही कारागृहात स्थानबद्ध आहेत. टवाळखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई सातत्याने केली जात आहे. पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस सजग असला की गुन्हेगारांना संधी मिळत नाही. सोनसाखळी चोरट्यांवर अंकुश आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. अपघाती मृत्यु 34 ने घटले, याचा अर्थ वाहतूक शाखेच्या सकारात्मक कारवाईमुळे हे प्रमाण घटले असे म्हणता येईल. त्याचे समाधान आम्हाला आहे. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com