पराभव अपेक्षितच, आता पक्ष बळकटीकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जळगाव - भारतीय जनता पक्षाने आमचे चांगले उमेदवार पळविले, त्यानंतर त्यांनी निवडणुकीत पैशाचा आणि प्रशासनाच्या बळाचा वापरही केला, त्यामुळे आमचा पराभव होणार, एकही उमेदवार निवडून येणार नाही हे अपेक्षितच होते. मात्र आता यापुढे आम्ही शहरात पक्ष बांधणीकडे लक्ष देणार आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

महापालिका निवडणूक निकालाच्या बाबतीत ते म्हणाले, जळगाव महापालिकेत सुरेशदादा जैन यांची सत्ता होती, त्यांनी विकासाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे जनतेने शिवसेनेला नाकारले. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सत्ता नसल्याने आमच्याकडे पर्याय म्हणून पाहण्याची शक्‍यता नव्हती. भाजपकडे केंद्रांत व राज्यात सत्ता असल्याने तसेच त्यांनी 200 कोटी तातडीने आणण्याची हमी दिल्याने विकासाच्याबाबतीत जनतेने भाजपकडे पर्याय म्हणून पाहिले आहे. त्यामुळे जनतेने भाजपवर विश्‍वास ठेवला आहे. या शिवाय भाजपने निवडणुकीत पैसा आणि प्रशासनाच्या बळाचाही वापर केला आहे. त्यामुळे त्यांना यश मिळाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळण्याची अपेक्षाच नव्हती. कारण भारतीय जनता पक्षाने आमचे चांगले उमेदवार पळविले होते. ज्यांची निवडून येण्याची क्षमता होती, तसेच आर्थिक ताकदही होती असे उमेदवार आमच्याकडून भाजपने पळविले. आमच्याकडे आलेले बहुतांश उमेदवार नवखे होते, तसेच त्यांची आर्थिक क्षमताही फारशी नव्हती. तरीही त्यांना उमेदवारी द्यावी लागली होती. मात्र पैशांपुढे आमचे उमेदवार कमी पडणार याचीही आम्हाला माहिती होती. आमची एकही जागा निवडून येणार नाही याचा अंदाजही आम्हाला आला होता. 

संघटना बांधणी करणार 
महापालिका निवडणुकीत अपयश येणारच याची माहिती असल्याने आम्ही त्याबाबत फारसे आत्मचिंतन करणार नाही, मात्र आता आपण संघटना बळकटीकडे लक्ष देणार आहोत, आम्ही शहरात संघटना बळकटी फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र संघटना बळकटीच्या माध्यमातून शहरातील जनतेचे प्रश्‍न सोडविणार आहोत. आगामी निवडणुकीत मात्र आम्ही कार्यकर्त्यासह संपूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत. 

Web Title: The defeat is expected now the party's focus on strengthening says Gulabrao Deokar