नाशिकमध्ये 'डिफेन्स इनोव्हेशन हब' - डॉ. सुभाष भामरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नाशिक - संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूरपाठोपाठ नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब' होईल, असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे सांगितले. राज्यात "डिफेन्स हब'ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल शुक्रवारी (ता. 15) चर्चासत्र होत आहे. त्यासंबंधीची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते.

सार्वजनिक उद्योग, स्टार्टअप, वैयक्तिक इनोव्हेटर्स, संशोधन आणि विकास संस्थांसाठी संरक्षण इनोव्हेशन हबच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होईल. संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्राशी निगडित उद्योगांमधून 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन होते. उरलेले "आउटसोर्स' करण्यात येते. त्यादृष्टीने छोटे उद्योजक तयार व्हायला हवेत म्हणून संरक्षण "इको सिस्टीम'चे राबवण्यात येते. इनोव्हेशन हबसाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून संशोधन आणि विकासातून पुढे येणाऱ्या बाबी भारतीय संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील. "इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्‍सलन्स' योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. योजनेसाठी "डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन'चा निधी दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

खासगी संस्थांनी संरक्षण भांडारविषयक तयार केलेल्या साहित्याची गुणवत्तेची हमी देण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सीज आणि व्यापार प्राप्ती योग्य सूट प्रणाली याचा शुभारंभ चर्चासत्रात होईल, असे सांगून डॉ. भामरे म्हणाले, 'सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्‍चरर्स, भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सी.आय.आय.तर्फे शुक्रवारी (ता. 15) दिवसभर हॉटेल एमरॉल्ड पार्कमध्ये संरक्षण व संरक्षण हवाई उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी संधी या विषयावर चर्चासत्र होईल. त्यातून संरक्षण क्षेत्राशी निगडित व्हेंडरशिप विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.

Web Title: defence innovation hub in nashik subhash bhamre