किकवारीकरांची ग्रामविकासक्रांती (यशोगाथा)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.

डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com
 

गावामध्ये स्वच्छता, स्थानिकांच्या कौशल्यानुसार रोजगार, व्यवसायासाठी वित्त पुरवठा, पिण्यासाठी स्वच्छ व समान पाणी, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, दर्जेदार शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, जलसंधारणाची कामे, वनीकरण या बाबी ग्रामविकासाचे मानक असतील, तर किकवारी खुर्द (ता. बागलाण) या गावाने खरोखरीने ग्रामविकास साध्य केला आहे. ग्रामविकासाठी एका दिशेने काम करण्याचा १२ वर्षांपासून केलेला संकल्प व त्याचे दिसणारे परिणाम बघता राज्यातील इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

किकवारी खुर्द येथील ग्रामस्थांनी एकरच्या जोरावर जिल्ह्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात नावलौकिक मिळवून राज्याच्या नकाशावर नाव कोरले. गावात २१८ घरे व २६२ कुटुंब, केवळ एक हजार ३५८ लोकसंख्या. कौलारू घरांमुळे गाव शोभून दिसते. नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, आमचे गाव आमचे सरकार या पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करून शासनाच्या वनीकरण मोहिमेत सहभागी होऊन गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्‍न पूर्णपणे मिटवला आहे. ग्रामपंचायतीच्या १०६ हेक्‍टर जमिनीवर वनीकरण करण्यात आले आहे. त्या परिसरात दर वर्षी पाच हजार झाडांची लागवड केली जाते. ग्रामपंचायतीने ट्रॅक्‍टर खरेदी केला असून, त्याच्या सहाय्याने ग्रामपंचायतीच्या जागेचे सपाटीकरण करून तेथे सीताफळ, डाळिंब, आंबा, आवळा, साग अशी पाच हजार फळझाडे लावण्यात आली आहेत. आंतरपीक म्हणून भाजीपाला घेण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढू शकते.

प्रयोगाचे स्वरूप

  • नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, आमचे गाव
  • आमचे सरकार या पंचसूत्रांची अंमलबजावणी
  • ‘एक गाव- एक गणपती’, ‘एक गाव- एक पाणवठा’, ‘एक गाव- एक संस्कृती’, ‘एक गाव- एक स्मशानभूमी’, ‘बिनविरोध निवडणुका’
  • सात स्वयंसहाय्यत बचत गट स्थापन

साध्य झालेली उद्दिष्टे

  • पडीत क्षेत्राचे बागायतीत रूपांतर
  • मजुरांचा स्थलांतर थांबले
  • ग्रामस्थांच्या आरोग्यात सुधारणा
Web Title: Delivering Change Forum Nashik Rural