गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाची एक लाख तीस हजारांची मागणी

गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाची एक लाख तीस हजारांची मागणी

सटाणा : बनावट कागदपत्रांद्वारे अकरा लाख रुपयांचे पिक कर्ज घेऊन महाराष्ट्र बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी येथील पोलीस उपनिरीक्षक घायवट यांनी केलेली एक लाख तीस हजार रुपयांची मागणी केली होती. ती पूर्ण करण्याकरिता ऐन पेरणीचे दिवस असतांना वायगाव (ता.बागलाण) येथील एका गरीब शेतकऱ्यावर बैलजोडी आणि भावजईचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची दुदैवी वेळ आली.

एकीकडे कर्जबाजारीपणामुळे राज्यात सर्वत्र शेतकरी आत्महत्या होत असतांना दुसरीकडेया खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्यांच्या अशा वर्तनामुळे संतापाची लाट उसळली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, महिनाभरापूर्वी ता. ४ जून रोजी वायगाव (ता.बागलाण) येथील संजय अर्जुन जाधव व त्यांची पत्नी आशाबाई जाधव यांच्या विरुद्ध सटाणा येथील महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकांनी बनावट कागदपत्रे सादर करून अकरा लाख रुपयांचे पिक कर्ज घेऊन फसवणूक केल्याची तक्रार सटाणा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार सटाणा पोलिसांनी जाधव कुटुंबियांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या शेतकरी दांम्पत्याला अटक केली होती. हा गुन्हा मागे घ्यायचा असेल तर मला दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने केली होती. अटक झालेला लहान भाऊ व भावजई यांना भेटण्यासाठी मोठे बंधू भगवान जाधव हे पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी जाधव दाम्पत्याने भगवान जाधव यांना दोन लाख रुपये पोलिसांना द्यायचे आहेत. त्यामुळे या पैशांची व्यवस्था करण्यासाठी बैल जोडी व मनी मंगळसूत्र विकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भगवान यांनी संबधित पोलीस उपनिरीक्षकाची भेट घेत दोन लाख रुपये जमा होत नाही, त्यात काहीतरी तडजोड करा, अशी विनंती केली.

दोन दिवसानंतर एक लाख तीस हजार रुपयांवर प्रकरण मिटविण्याचा निर्णय झाला. घरात लहान मुले एकटे असल्यामुळे भाऊ, भावजईला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी भगवान जाधव यांनी ऐन खरीप हंगामात बैलजोडी आणि मनी मंगळसूत्र गहाण ठेवून संबधित पोलीस उपनिरीक्षकाची आर्थिक मागणी पूर्ण केली. मात्र पैशांची मागणी पूर्ण करूनही पोलीस आपल्या भाऊ व भावजईला सोडत नसल्याने या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. दरम्यान आज सोमवारी (ता.२) रोजी दुपारी भगवान जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

असे आहे प्रकरण...
जून २०११ मध्ये वायगाव (ता.बागलाण) येथील संजय अर्जुन जाधव व त्यांची पत्नी आशाबाई जाधव या दाम्पत्याने रघुनाथ अर्जुन पवार व विमलबाई रघुनाथ पवार अशा बनावट नावाने खोटे दस्तावेज तयार करून महाराष्ट्र बँकेकडून ११ लाख रुपयांचे पिक कर्ज घेतले होते. मात्र व्याजाच्या रक्कमेसह १७ लाख ३१ हजार थकबाकी होऊनही कर्जदार शेतकरी कर्ज भरत नसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब टाव्हरे यांनी ता. ४ जून २०१८ रोजी सटाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाला त्यावेळी वैद्यकीय रजेवर असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःकडे या गुन्ह्याचा तपास घेतला होता. गुन्हा मागे घेण्यासाठी संबधित अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम घेतली असेल तर त्याबाबत आपण चौकशी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करू. कोणी पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी गुन्हे मागे घेण्यासाठी अशी आर्थिक पिळवणूक करत असेल याबाबत तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा.       - हिरालाल पाटील, पोलीस निरीक्षक, सटाणा

शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच देशोधडीला लागला असून आत्महत्या करीत आहे. त्यात गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिसांना पैसे देण्याकरिता शेतकऱ्याला बैलजोडी आणि मनी मंगळसूत्र गहाण ठेवावे लागत असेल तर आजही आपला देश गुलामगिरीतच असल्याचे चित्र आहे. शासनाने अशा खाकी वर्दीतल्या गुंडांचा तत्काळ बंदोबस्त करावा. या प्रकाराबाबत आमदार बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ते आवाज उठविणार आहेत.        
- तुषार खैरनार, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना

लहान भाऊ व भावजई तुरुंगात असल्याने त्यांचा खरीप पेरा अद्यापही झालेला नाही. आम्ही कुटुंब विभक्त असल्यामुळे त्यांची लहान मुले घरात एकटीच आहेत. पोलीस अधिकाऱ्याला पैसे दिल्यावर भाऊ, भावजई घरी परततील या आशेपायी त्यांनी सांगितल्यानुसार बैलजोडी व मनी मंगळसूत्र विकून पोलिसांना एक लाख तीस हजार रुपयांची रक्कम देऊन त्यांची मागणी पूर्ण केली. मात्र आमच्यावर अन्यायच झाला आहे. याबाबत आपण आपल्या कुटुंबीयांसह संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे कैफियत मांडणार आहोत.        
- भगवान जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com