नोटबंदीने शेतीला 4 हजार कोटींना लुबाडले

संपत देवगिरे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

"नोटबंदीचे निमित्त करुन शेतमालाचे भाव पाडले हे उघड सत्य आहे. प्रत्येक कांदा उत्पादकांच्या कुटुंबाला एक ते दिड लाखांची झळ बसली आहे. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.'

- डॉ. गिरधर पाटील, शेतकरी नेते.

नाशिक : नोटबंदीच्या निर्णयानंतरच्या 47 दिवसांत देशभरातील शेतीमालाचे भाव साठ टक्के घसरल्याची आकडेवारी केंद्रीय फलोत्पादन मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदर्शीत झाली आहे. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यातील प्रमुख भाजीपाला पिकांची आवक व दरांचे विश्‍लेषण केल्यास जेव्हढे काळे धन मिळाल्याचा दावा शासन करीत आहे जवळपास त्याहून अधिक झळ शेतकऱ्यांना सोसावी लागल्याची भिती आहे. प्रमुख भाजीपाला पिकांचेच दर घसरल्याने तीन हजार कोटींहून अधिक नुकसान शेतकऱ्यांच्या खीशातून गेल्याने सर्जीकल स्ट्राईक देशभरातील शेतकऱ्यांच्या जिव्हारी ठरणार आहे.

नोटबंदीच्या निर्णयानंतर दैनंदीन जिवनात अत्यावश्‍यक असलेल्या कांदा, बटाटा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर या भाजीपाल्याचे दर तपासल्यास अत्यंत धक्कादायक चित्र आहे. गेल्या दोन महिन्यात देशातील 29 प्रमुख बाजारपेठांत 5.55,204 लाख टन कांदा आवक झाली. त्याचा सरासरी दर 2883 रुपयांवरुन थेट 400 रुपयांवर घसरला. देशभरातील याच कालावधीतील सरासरी दर 2622 रुपये प्रती क्विंटल वरुन 1010 रुपये झाला आहे. मुंबईत हा दर 1913 रुपयांवरुन 393, लासलगावला 2103 वरुन 807, नाशिकला 2474 वरुन 848, पुण्यात 3053 वरुन 910 झाला. त्याचा परिणाम म्हणजे कांदा उत्पादकांच्या खीशातून 555 कोटीं लुबाडले गेले.

टोमॅटो हे उत्तर भारत, पश्‍चिम बंगालसह जवळपास सर्वच भागात विक्रीला येते. त्यात स्थानिक व हायब्रीड असे दोन वाण असून देशातील एकोणतीस शेती बाजारपेठांत त्याची नोव्हेंबरमध्ये 1,15,102 टन तर डिसेंबरमध्ये 91,210 अशी 2,06,312 टन आवक झाली. त्याचे दर मात्र 2951 रुपये प्रती क्वींटल वरुन 544 एव्हढे घसरले. याच काळात प्रमुख केंद्र असलेल्या पिंपळगाव बसवंला क्वींटलचे दर 2825 वरुन 476, मुंबईला 3278 वरुन 704, नाशिकला 2951 वरुन 544 एव्हढे दर घसरले. त्यात प्रती क्वींटल दिड हजार रुपयांची झळ बसल्याने 309.46 कोटींची झळ शेतकऱ्यांना बसली.

बटाट्यात कोल्ट स्टोअरेज आणि ताजे असे दोन प्रकार आहेत. त्याची देशभरात 2,33,992 टन आवक झाली. त्याचे दर 1225 वुरने 725 रुपये प्रती क्विंटल एव्हढे खाली आले. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी साठविलेला 1,08,598 टन बटाटा बाजारात आला. त्याचे दर मात्र केवळ 200 रुपयांनी कमी झाले होते. त्यात शेतकऱ्यांना नोटबंदीचे कारण देऊन दर घसरले तर व्यापाऱ्यांना त्याचा त्रास झाला नाही. एकंदरच सरकार, व्यापरी असो वा ग्राहक सगळ्यांना कोंडी करण्यास शेतकरीच सोपे वाटतात हे यावरुन स्पष्ट होते. प्रत्येक पीकाची हीच स्थिती असल्याने केवळ महाराष्ट्राशी संबधीत कांदा, बटाटा, टोमॅटोच्या पीकांचेच दर केवळ पन्नास दिवसांत बाराशे कोटींनी पाडण्यात आले आहेत. कोबी, फ्लॉवर, वाटाणा, वांगी, गाजर अशा अनेक पीकांची एकत्रीत रक्कम चार ते साडे चार कोटींवर जाते. फळे, धान्य आदींचा त्यात समावेष केलेला नाही. त्यामुळे नोटबंदीच्या निमित्ताने झालेले सर्जीकल स्ट्राईकने देशोधडीला लागलेला शेतकरीच घायाळ झालाय.

सगळ्यांचेच मौन
नोटबंदीने जिल्हा बॅंका व सहकारी बॅंकांच्या व्यवहारांवर बंदी आली. त्याने व्यापरी व आडत्यांनी जुन्या नोटा देऊन शेतकऱ्यांची कोंडी केली. काळे पैसे, गैरव्यावहार खासगी बॅंकात होत असतांना त्यांना मोकळीत मात्र सहकारी बॅंकांना बंदीची झळ थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसली. शेतमालाचे दर पन्नास दिवसांत कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्वेषात असलेले सरकार अन्‌ त्यांचे समर्थकांच्या हे लक्षात आलेले नाही. त्यामुळे प्रामाणीक व कष्टकरी शेतकऱ्यांचे हे नुकसान कोण भरुन देणार यावर सगळ्यांचे मौन आहे.

Web Title: demonetisation dupes for 4000 crore rupees