'एसटी'सह खासगी ट्रॅव्हल्स, रिक्षा-टॅक्‍सीचालकांचे उत्पन्न घटले 

Indian Currency
Indian Currency

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्य परिवहन महामंडळाला रोज मिळणाऱ्या उत्पन्नात 20 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. काही मार्गांवर रिकाम्या बसगाड्या चालवत नुकसानही सोसावे लागते आहे.

खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंगवरही या निर्णयामुळे परिणाम झाला असून, व्यवसाय करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रिक्षा, टॅक्‍सीचालकांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. टोलमाफी व पेट्रोलपंपांवर जुन्या नोटा चालत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. 

दळणवळणाशी विविध व्यवसाय निगडित असतात, पण पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या व्यवसायावर परिणाम होत आहे. राज्य परिवहन महामंडळामार्फत विविध दुर्गम भागात बसगाड्या चालविल्या जातात. सध्या नोटा बदलण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी होत असल्याने प्रवासी संख्या रोडावली आहे. सुट्यांच्या अडचणीमुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांत वादविवाद निर्माण होताहेत. या निर्णयानंतर 'एसटी'च्या उत्पन्नात सुमारे 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिक आगार-1 चे साधारणतः सोळा लाख, तर शहर वाहतूक बसपासून बारा लाख, असे सुमारे 28 लाख रुपये रोजचे येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 20 ते 30 टक्‍के घट जाणवत असल्याचे बोलले जात आहे. 

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना टोलमाफी, पेट्रोलपंपांवर नोटा चालत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे; परंतु आरटीओ बॉर्डर चेकपोस्टवर जुन्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने, तसेच मार्गात हॉटेल व्यावसायिकांकडून जुना नोटा घेतल्या जात नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हिवाळी हंगामातील बुकिंगवरही परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. 

रिक्षाचालकांना मिळेना प्रवासी 
पूर्वी दिवसभरात साधारणतः दहा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना आता दिवसाला अवघे एक-दोन प्रवासीच मिळत असल्याने उत्पन्नात लक्षणीय घट झाल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. टॅक्‍सी व्यवसायदेखील थंडावला आहे. सुट्यावरून प्रवाशांशी वाद होत असल्याची तक्रार काही व्यावसायिकांची आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे 40 टक्‍के उत्पन्न बुडाले आहे. पैशांअभावी काहींना इच्छा असून प्रवास करता येत नसल्याची स्थिती आहे. दैनंदिन कामात सुट्यांवरून वाद होत असल्याच्या तक्रारी आहेत. शासनाने सुट्या पैशांसंबंधी व्यवस्था करण्याची गरज आहे. 
- सुभाष जाधव, राज्य सरचिटणीस, एसटी कामगारसेना 

वाहक व प्रवाशी आपापली जबाबदारी ओळखून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताहेत. काहींना त्रास होत असला, तरी त्यातून तोडगा काढला जातो आहे; परंतु व्यवहार सुलभ करण्यासाठी पाचशेच्या नव्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्‍यक झाले आहे. 
- प्रमोद भालेकर, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना 

टोल व पेट्रोलपंपांच्या निर्णयाने काहीसा दिलसा मिळाला आहे; परंतु प्रवासादरम्यान चेकपोस्टवर अडचणींना सामोरे जावे लागते आहे. विविध टूरच्या बुकिंगवरही परिणाम झाला आहे. 
- ब्रिजमोहन चौधरी, संचालक, चौधरी यात्रा कंपनी 

नोटाबंदीचा निर्णय जरी चांगला असला, तरी यामुळे रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. प्रवासी फेऱ्या घटल्या आहेत. रोजचे उत्पन्नदेखील कमी झाले आहे. अनेक जण प्रवास झाल्यानंतर जुनी नोट देत आहेत. यामुळे पेट्रोलपंपावर थेट पाचशेचेच पेट्रोल भरावे लागत आहे. आता महिनाअखेर असल्याने हप्ता व इतर खर्च वगळता फार काही पैसे मिळणार नाहीत. 
- सुनील देवरे, रिक्षाचालक 

नोटाबंदीचा परिणाम नक्कीच व्यवसायावर होत आहे. प्रवासी वाहतूक फेऱ्या घटल्या. रोजच्या फेऱ्या निम्म्यावरच आल्या आहेत. सकाळी लवकर येऊनही अपेक्षित व्यवसाय होत नाही. 
- मधुकर पाटील, रिक्षाचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com