सावधान ! मालेगावमध्ये फोफावतोय डेंग्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

मालेगाव : दोन आठवड्यांत ३४ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह आढळले. १८४ संशयित रुग्ण असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. साथ आजाराच्या पार्श्‍वभूमीवर शहरात १४ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून १४५ आशा कर्मचारी बेटिंग व सर्वेक्षण करीत असल्याचे आयुक्त किशोर बोर्डे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सायका अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

मालेगाव  : महापालिका कार्यक्षेत्रात डेंगीच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेंगीबरोबरच थंडी, ताप, टायफाइड यांसह विविध साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ८९ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. दोन आठवड्यांत ३४ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह आढळले. १८४ संशयित रुग्ण असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. साथ आजाराच्या पार्श्‍वभूमीवर शहरात १४ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून १४५ आशा कर्मचारी बेटिंग व सर्वेक्षण करीत असल्याचे आयुक्त किशोर बोर्डे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सायका अन्सारी यांनी शनिवारी (ता. २१ ) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

फवारणीसंदर्भातील तक्रारी कायम

महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके आदींसह नगरसेवकही उपस्थित होते. संबंधितांनी रुग्ण संख्या, साथ आजार, उपलब्ध औषधे, स्वच्छता व आरोग्याच्या उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. नगरसेवकांच्या फवारणीसंदर्भातील तक्रारी कायम आहेत. सामान्य रुग्णालय व महापालिका रुग्णालयांशिवाय खासगी रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण दाखल आहेत. अनेक रुग्णालयांत रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत. खासगी रुग्णालय व महापालिका आरोग्य विभागात समन्वयाचा अभाव आढळून येत आहे. त्यामुळे डेंगी पॉझिटीव्ह व डेंगीसदृश रुग्णांची निश्‍चित संख्याही समजू शकली नाही. 

नागरिकांनो घ्या काळजी..

डेंगीचा डास एडीस इजिप्ट हा स्वच्छ पाण्यात वाढतो. प्रामुख्याने दिवसा चावतो. नागरिकांनी या संदर्भात काळजी घ्यावी. स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. घर व परिसरात पाण्याची डबकी साचणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पाण्याची भांडी, टाक्‍या, रांझण उघडे राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. रिकामे टायर, शहाळे यात या डासांची उत्पत्ती होते. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अन्सारी व डॉ. एम. बी. त्रिभुवन यांनी केले. 
डेंगी व साथीच्या आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मलेरिया विभागाचे राज्य सहसंचालक रघुनाथ भोई यांनी शुक्रवारी (ता.२०) येथे भेट देऊन आढावा बैठक घेतली. साथीच्या आजारांचा आढावा घेतानाच ते रोखण्यासाठीच्या उपाययोजना, स्वच्छता, फवारणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. किशोर डांगे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल डेंगी व अन्य साथ आजाराच्या रुग्णांची माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue population increases in Malegaon