देवजीपाडा येथे चौकाचौकात पाण्याची प्रतीक्षा (व्हिडिओ)

भगवान जगदाळे
शनिवार, 19 मे 2018

तहानलेले गाव : स्पॉट रिपोर्ट...

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथ्यासह आदिवासी भागातील बुराई नदीच्या उगमस्थानावरील देवजीपाडा (ता.साक्री) येथे सद्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून येथील महिला कामधंदे सोडून अक्षरशः भर दुपारी रणरणत्या उन्हात चौकाचौकात पाण्याची प्रतीक्षा करताना दिसून येतात. साधारण चार ते पाच दिवसाआड पाणी येत असल्याने एक-एक किलोमीटर पायपीट करून डोक्यावर पाणी आणावे लागते. सुमारे पंधराशे लोकवस्तीचे देवजीपाडा-तोरसपाडा हे सात सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव.!

तहानलेले गाव : स्पॉट रिपोर्ट...

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथ्यासह आदिवासी भागातील बुराई नदीच्या उगमस्थानावरील देवजीपाडा (ता.साक्री) येथे सद्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून येथील महिला कामधंदे सोडून अक्षरशः भर दुपारी रणरणत्या उन्हात चौकाचौकात पाण्याची प्रतीक्षा करताना दिसून येतात. साधारण चार ते पाच दिवसाआड पाणी येत असल्याने एक-एक किलोमीटर पायपीट करून डोक्यावर पाणी आणावे लागते. सुमारे पंधराशे लोकवस्तीचे देवजीपाडा-तोरसपाडा हे सात सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव.!

चौकाचौकात पाण्याची प्रतीक्षा...
येथील ग्रामस्थ व महिला गावातील प्रत्येक चौकात हंडे ठेवून चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करताना आढळून येतात. प्रत्येक चौकात किमान ५० ते ६० हंडे नंबर लावून ठेवलेले असतात. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना पाणी आले तरी अतिशय अल्पशा प्रमाणात येते. थोडा वेळ पाणी आले तरी तेही रोटेशन पद्धतीने विशिष्ट गल्ल्या व वस्त्यांपुरते. किमान चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो तोही अपूर्ण. मधल्या काळात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सरपंच, उपसरपंच तोरसपाडा येथे राहतात. तेथून सरपंचांनी स्वतःच्या विहिरीचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

अठरा लाखांची पाणीपुरवठा योजना कुचकामी...
या गावासाठी सुमारे १८ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पण तिची अंमलबजावणीच नाही. गावात मराठा व आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. पण विकासापासून कोसो दूर असलेले हे गाव.
सन २०१३-१४ मध्ये मंजूर झालेली पाणी पुरवठा योजनाही राजकीय उदासीनता व प्रशासकीय अनास्थेमुळे बासनात गुंडाळली गेली. गावाचा जलयुक्त शिवारात समावेश असूनही आजपर्यंत कोणतेही काम झाले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. २५:१५ च्या निधीतून १० लाख रुपये मंजूर करून त्यातून विकासकामे सुरू असल्याचा दावा गटनेते रमेश शेवाळे यांनी केला आहे. लोकसहभाग, लोकवर्गणी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ३ ते ४ कूपनलिका सुमारे सातशे ते आठशे फूट खोल करूनही पणीपातळीअभावी ते कोरडेठाक आहेत. गावशिवारातील शेतकऱ्यांच्या विहिरींनाही सत्तर फुटाच्या पुढेच पाणी लागते.

भारनियमन व अनियमित वीजपुरवठयामुळे ग्रामस्थ त्रस्त...
गावाला चोवीस तासापैकी जेमतेम सात ते आठ तास वीजपुरवठा होतो. तोही अनियमितपणे होतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थ उकाड्याने प्रचंड हैराण होतात. गावात बीएसएनएलसह इतर खाजगी कंपन्यांचेही प्रभावी नेटवर्क नाही. त्यामुळे संपर्क यंत्रणाही पूर्णपणे कोलमडून पडते. कृषी विभागाने श्रमदानातून एक दोन बंधारेही बांधलेले आहेत. पण तेही कुचकामी ठरले आहेत. जवळच पाचमौलीचा पाझर तलाव आहे. तोही गाळ साचल्याने कोरडाठाक पडला आहे. त्याचे खोलीकरण करून गाळ काढल्यास पाण्याची समस्या दूर होईल. बुराई नदीचे पात्रही अतिशय अरुंद व खडकाळ असून गावाजवळ एकही बांध नाही. तेथेही बांध बांधून पाणी अडविल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होईल.

यांच्याकडून अपेक्षा...
सरपंच आशाबाई चौरे, उपसरपंच संजय अहिरे, ग्रामसेवक दत्तात्रय बोरसे, पोलीस पाटील दत्तात्रय नांद्रे, पंचायत समिती सदस्या रंजना बहिरम, नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या लिलाबाई सूर्यवंशी, तालुक्याचे आमदार डी. एस. अहिरे, खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. निवडणूक झाल्यानंतर पंचायत समिती सदस्या, जिल्हा परिषद सदस्या, आमदार, खासदार यांच्यासह अधिकाऱ्यांनी आजपर्यंत गावास साधी भेट देऊन विचारपूस देखील केली नाही. अशी खंत डॉ. संभाजी काकुस्ते, रमेश शेवाळे, शरद नांद्रे, राहूल जगताप आदींसह गावकऱ्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली आहे...

प्रतिक्रिया...
"बुराई नदीवर गावाजवळ किमान चार ते पाच केटीवेअर बंधारे बांधल्यास भूजलपातळी वाढून निश्चितच गावाची पाणी समस्या सुटण्यास मदत होईल."
- डॉ. संभाजीराव काकुस्ते, माजी उपसरपंच, देवजीपाडा.

"लोकप्रतिनिधींना अधिकारी जुमानत नसल्याने विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही."
- रमेश शेवाळे, गटनेते, ग्रामपंचायत, देवजीपाडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devajipada people waiting water