देवकरांची उमेदवारी लढतीचे गणित बदलवणारी

देवकरांची उमेदवारी लढतीचे गणित बदलवणारी

जळगाव - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विकासाच्या प्रश्‍नावर लढविण्यापेक्षा आर्थिक गणितावरच अधिक लढविली जाते, असा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ आर्थिक सक्षम उमेदवार शोध घेतला जातो, यात बहुतांश नवीन उमेदवार असल्याचे दिसून आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत यावेळी प्रथमच राष्ट्रवादीतर्फे राज्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीतर्फे निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी गेल्या काही वर्षांत झालेल्या तील लढतींचे चित्र पाहता अनुभवी असलेल्या देवकरांची उमेदवारी मुळातच राजकीय वर्तुळात प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जळगाव मतदारसंघाची निवडणूक गेल्या तीस वर्षांत वेगळ्याच वळणावर आहे. पक्ष कोणताही असो त्या पक्षाने आपला उमेदवार देताना त्याच्या निष्ठेच्या विचार केलेला नाही. त्या उमेदवारांची सक्षम आर्थिक क्षमता हाच उमेदवारीचा प्रमुख निकष राहिला आहे.

राष्ट्रवादीतर्फे या निवडणुकीत राजकारणातील अनुभवी नेते (कै.) जे.टी.महाजन यांना विधानपरिषदेत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र या निवडणुकीत राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी कधीही उमेदवारी केलीच नाही. बहुतांशी नवीन दमाचे उमेदवार दिले गेले. सुरेशदादा जैन यांनी जिल्ह्याच्या राजकारणात फारशी ओळख नसलेले ऍड.शरद वाणी यांना दोनवेळा संधी दिली, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ए.टी.पाटील यांना पक्षातर्फे राजकारणात उतरविले. परंतु, त्यांनाही पराभव पत्करावा लागला, त्यानंतर एकनाथराव खडसे यांच्या पाठिंब्यावर डॉ.गुरुमुख जगवानी हे राजकारणात नवखे म्हणूनच उमेदवार होते त्यांना मात्र विजय मिळाला. तर एकनाथराव खडसे यांचे चिरंजीव (कै.)निखिल खडसे हे राजकारणाच्या क्षेत्रात नवीनच उमेदवार होते, तर मनीष जैन यांच्याही राजकारणाची सुरवात विधानपरिषद निवडणुकीतूनच झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भुसावळचे अनिल चौधरी यांना त्यावेळी उमेदवारी दिली. मात्र त्यांनाही पराभव पत्करावा लागला.

निवडणुकीतील गेल्या काही वर्षांतील उमेदवारी पाहता (कै.)महाजन यांच्या नंतर प्रथमच राजकारणात अनुभवी असलेले आणि माजी मंत्री असलेले गुलाबराव देवकर रिंगणात उतरत आहे. देवकर राजकारणातील दिग्गज आहेत. विशेष म्हणजे नगरसेवक, नगराध्यक्ष ते राज्याचे मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांना या निवडणुकीचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत तरी देवकर उतरणार नाहीत असा राजकीय कयास होता. मात्र त्यांनी अचानक अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय क्षेत्रात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देवकरांसारखे अनुभवी नेते केवळ उमेदवारी करावयाची आहे म्हणून अर्ज भरणार नाहीत. तर त्यामागे निश्‍चितच त्यांची काही गणिते असतील असेही मानले जाते. देवकरांच्या मागे पक्षाची वरिष्ठ स्तरावरूनच ताकद दिसत आहे. विधानपरिषदेच्या राज्यातील जागांमध्ये आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेससमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने कुठेही तडजोड केलेली नाही. विधानपरिषदेत आपले संख्याबळ अधिक ठेवण्यासाठी त्यांनी राज्यात पाच जागा लढविल्या आहेत. त्या सर्व जागा जिंकण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच पक्षाने जळगावची जागाही जिंकण्याची तयारी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनुभवी असलेले देवकर यांची उमेदवारी असल्याचा सध्यातरी कयास आहे. त्यामुळे देवकर माघारी घेण्याच्या शक्‍यतेपेक्षा ते विजयाचे गणित जोडण्यात त्यांचा अनुभव पणाला लावतील. देवकरांनी उमेदवारी कायम ठेवून लढतीत विजय मिळविल्यास भविष्यात मात्र जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची गणिते बदलतील एवढे मात्र निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com