देवानंदची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी 

devanand
devanand

जळगाव : "किती वाहावे आता दु:खाचे भार, सोसले फार... मी माझे मम म्हणालो, जो कामी कुणा न आला, नश्वर हा देह आता जगण्यास भार झाला...' प्रतिभावंत नवोदित कवी देवानंद गुरचळ यांच्या अखेरच्या कवितेच्या या ओळी त्यांच्याबाबत तंतोतंत खऱ्या ठरल्या. दुर्धर आजाराचा सामना करताना सतत मृत्यूशी दोन हात करत ते अखेरपर्यंत जिद्द आणि आत्मविश्‍वासाने झुंजत राहिले. पण, नियतीला त्यांची झुंज मान्य नव्हती... नियती पुढे शेवटी कुणाचे चालले..? देवानंदानेही अखेर नियतीपुढे हात टेकत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात काल (ता. 2) मध्यरात्री अखेरचा श्‍वास घेतला अन्‌ त्यांच्या मित्रपरिवारातील साहित्यिकांची मने कळवळून गेली. 

बोदवड तालुक्‍यातील शिरसाळा गावचा देवानंद राघो गुरचळ. या प्रतिभावान नवोदित कवीला गरिबी आणि बेरोजगारीबरोबरच "व्हेरिगोज व्हेन' या दुर्धर आजाराने ग्रासले होते. गेल्या महिन्यात "सकाळ'मध्ये दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या "यंग स्टार' या युवा पानात प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी देवानंदच्या संघर्षाची कहाणी मांडली होती. त्यातील देवानंदची संघर्षगाथा वाचून खानदेश साहित्य मंचच्या ग्रुपने आवाहन करत लाखो रुपये त्याच्या उपचारासाठी अवघ्या दोन दिवसांत जमवले. मात्र, त्यांची मदतही नियतीने कुचकामी ठरविली. 

देवानंदचे गावाबाहेर दलित वस्तीत झोपडीवजा घर. शेतमजूर आई-बापाच्या पोटी जन्मलेल्या देवाला संघर्ष, अभाव, दुःख, वेदना या जन्मजात मिळाल्या. त्यातही देवाने शिक्षणाची कास धरली, पदव्या मिळवल्या. विद्यापीठ सचिवापर्यंत त्याने मजल मारली. कविता, भाषण, नाटक या साहित्यकृती तो प्रतिभावान म्हणून पुढे आला. आता लवकरच तो डॉक्‍टरेटही होणार होता. कुटुंबीयांच्या तगाद्यामुळे त्याने तशाही परिस्थितीत लग्न केलं. बायकोही शेतात मजुरी करून घराला हातभार लावणारी. बीएड करून कुठेतरी शिक्षकाची नोकरी मिळेल, म्हणून बायकोचे दागिने विकून बीएड केलं. एका खासगी वसतिगृहात त्याला अस्थायी नोकरी मिळाली. पण, पगार मजुराला मिळतो त्याहूनही कमी. घरापासून दूर. त्यात दोन मुलींचा बाप झाला आणि आजाराने डोके वर काढले. कुणापुढे हात न पसरता काम करून उपचारासाठी तो पै पै जमवत होता, दुखणं अंगावर काढत होता. 

त्याच्या दोन्ही पायांतील गुडघ्याच्या खाली रक्त गोठण्याच्या आजाराने दोघेही पाय काळे आणि जाड झालेले होते. चालताना असह्य वेदना झेलत परवा देवानंद पुण्याला आपल्या एका नातेवाइकाला घेऊन डॉक्‍टरांकडे चेकअपसाठी गेला होता. परतीच्या प्रवासात औरंगाबादजवळ बसमध्ये अचानक तो बेशुद्ध झाला. त्याला जवळच्या व्यक्तींनी घाटी हॉस्पिटल येथे बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. देवाच्या उपचारासाठी पत्नीने अंगावरील दागदागिने कधीच मोडून टाकले होते. या माऊलीचा जीवनसाथी आजारातून बरा व्हावा, तिच्या दोन लहान चिमण्यांचा बाप त्यांना पितृछत्र धरण्यासाठी हवा होता. यासाठी खानदेश साहित्य मंच या व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर आर्थिक मदतीचे आवाहन केले. प्रत्येकानेच आपापल्या परीने आर्थिक मदत जाहीर केली. लाखभर रुपये जमलेही. परंतु, नियतीला ही मदतही त्याच्यापर्यंत पोहचू द्यायची नव्हती आणि अखेर त्याने रविवारी मध्यरात्री "एक्‍झिट' घेतली. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com