एकता अन्‌ शिक्षणातून समाजाला विकासाची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नंदुरबार - एकता आणि शिक्षणातून समाजाला विकासाची संधी मिळत असते. आपल्यात काम करण्याची क्षमता आहे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्या गुणांची कदर आपोआप होत असते. आपण एकतेच्या भावनेतून सामाजिक बंधने पाळली पाहिजेत, असे आवाहन आज येथे अनेक वक्‍त्यांनी केले.

नंदुरबार - एकता आणि शिक्षणातून समाजाला विकासाची संधी मिळत असते. आपल्यात काम करण्याची क्षमता आहे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्या गुणांची कदर आपोआप होत असते. आपण एकतेच्या भावनेतून सामाजिक बंधने पाळली पाहिजेत, असे आवाहन आज येथे अनेक वक्‍त्यांनी केले.

आदिवासी दिनानिमित्त शहराच्या विविध भागातून आज मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुका बाजार समितीच्या आवारात विसर्जित झाल्या. तेथे जाहीर सभा झाली. तीत समाजाचे आदर्श याहामोगी माता, तंट्या भिल सह आदींचे स्मरण करण्यात आले. त्यावेळी माजी मंत्री ॲड. पद्‌माकर वळवी, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ. भरत वळवी, आदिवासी धर्मजागर आणि संवर्धन परिषदेचे मुख्य प्रवर्तक विनायक तुमराम, ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, लालूभाई वसावे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक आदी उपस्थित होते. भगतसिंग वळवी अध्यक्षस्थानी होते.

श्री. तुमराम म्हणाले, स्वतःची धार्मिक ओळख असल्याशिवाय संघटित शक्ती उभी राहणे अशक्‍य आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी, धार्मिक चेहरा परत मिळवण्यासाठी स्वधर्मजागर व स्वीकार सोहळा होणार आहे. दीक्षेपेक्षा शिक्षा आणि संस्कार अधिक महत्त्वाचे आहेत. आदिवासी धर्म असे नाव असेल. आदिवासी म्हणून देशात राहताना वेगवेगळे धर्म सांगितले जातात. त्यात एकरूपता येणे आवश्‍यक आहे.

माजी मंत्री ॲड. पद्‌माकर वळवी म्हणाले, आपल्या राज्यात, देशात दिवसेंदिवस बोगस आदिवासींची संख्या वाढती आहे. याबाबत आवाज उठवला जातो. मात्र त्यांना संरक्षण दिले जाते. आता युवकांनी याबाबत अधिक जागृत राहणे आवश्‍यक आहे. आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ. भरत वळवी, ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, लालूभाई वसावे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, भगतसिंग वळवी आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यात सामाजिक एकतेचा पुरस्कार करण्यात आला. सर्व वक्‍त्यांनी शिक्षण आणि एकतेबाबत आग्रह धरला. 

 

क्षणचित्रे

बाजार समिती आवारात गर्दी

कार्यक्रमस्थळी जेवणाची सोय

बैठक व्यवस्थेचे नियोजन 

विविध संघटनांचा सहभाग

तरुणांची लक्षणीय सहभाग

आतापर्यंत दरवर्षी आदिवासी महासंघातर्फे कार्यक्रम झाले. प्रथमच जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी उपस्थिती दिली.

Web Title: Development and education opportunities for community togetherness