एका वर्षात जळगावात विकासात्मक बदल - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जळगाव - जळगावातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षावर विश्‍वास ठेवून जो भरघोस विजय मिळवून दिला त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. तसेच एका वर्षात विकास करण्याचे गिरीश महाजन यांनी जे आश्‍वासन दिले त्याची पूर्तता करणे हे मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य समजतो. एका वर्षात आपण जळगावचा विकासात्मक बदल घडवून दाखवूच असा विश्‍वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी आज त्यांची मुंबईत भेट घेतली. 

जळगाव शहर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविला. त्या अनुषंगाने आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार चंदुलाल पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवानी, माजी महापौर ललित कोल्हे व नंदूशेठ अडवाणी, श्रीराम खटोड, चंदन कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्वांचे विजयाबद्दल कौतुक केले. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जळगावकर नागरिकांचे अंर्तमनापासून आभार व्यक्त करून भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे ही मुख्यमंत्री या नात्याने माझे आद्य कर्तव्य समजतो. शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी विकासासाठी कुठल्याच प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. गिरीश महाजनांनी दिलेले आश्‍वासन मुख्यमंत्री म्हणून पाळण्याची जबाबदारीही आपण घेतो. 

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी शहरासाठी मोठा निधी मिळावा अशी मागणी केली. शहराच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी साकडे घातले. हुडको कर्ज, गाळेधारकांचा प्रश्न त्वरित मार्गी लागावा तसेच मनपामध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन शहराच्या खंडित झालेल्या विकासाला गती मिळणेकामी चर्चा झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Developmental changes in one year says CM